पट्टणकोडोली गावच्या सरपंचपदाची धुरा अंबर बनगे यांना चार महिन्यांपूर्वी देण्यात आली होती. या काळात कोरोनाचा संसर्ग वाढून गाव हॉटस्पॉटवर गेले होते. अशावेळी उपसरपंच यांनी ग्रामपंचायत आयसोलेशन सेंटरमधून अनेक रुग्णांना उपचार देऊन बरे करण्यासाठी मोलाचे काम केले आहे. गावात पूरस्थिती असतानाही ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यात ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. मात्र त्यांचा कार्यकाल संपल्याने गेल्या काही दिवसांपासून उपसरपंचपदाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज जेष्ठ नेते मंडळी आणि कोअर कमिटीच्या सांगण्यावरून उपसरपंच अंबर बनगे यांनी राजीनामा दिला. होणाऱ्या उपसरपंचपदासाठी विमल चव्हाण, अंजली भोजकर, वंदना बिरांजे आणि नंदकुमार माळी यांच्या नावाची चर्चा सुरू असून उपसरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत ग्रामस्थांमधून उत्सुकता निर्माण झाली आहे.
फोटो ओळ : पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथील उपसरपंच अंबर बनगे यांनी आपल्यापदाचा राजीनामा सरपंच विजया जाधव यांच्याकडे आज दिला.