कोल्हापूर : कोरोनाचा कहर जसजसा संपत येऊ लागला आहे, तसतसे राज्यासह परराज्यांतील भाविक कोल्हापुरातील करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभर मंदिराबाहेरील परिसर भक्तांच्या लोंढ्यांनी अक्षरश: बहरला होता.
गेले कित्येक महिने कोरोना महामारीमुळे राज्यासह परराज्यांतील भाविक, पर्यटकांना मंदिरे, पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती. दिवाळी पाडव्यापासून ती खुली करण्यात आली. मंदिरे व पर्यटनस्थळे खुली करताना भक्तांकरिता मास्क, सॅनिटायझर, अंतर राखून रांगा, दर्शनासाठी ठरावीक वेळा निर्धारित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार भक्तांचा लोंढाही देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने कोल्हापुरातील करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येऊ लागला आहे. रविवारी दिवसभरात हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे महाद्वार रोड, जोतिबा रोड, भवानी मंडप, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, जेल रोड, आदी परिसरांत भाविक पर्यटकांचे जथ्ये दिसत होते. विशेषत: हॉटेल, रेस्टॉरंट, चप्पल लेन, अशा ठिकाणी खरेदीसाठी गर्दी दिसत होती. त्यामुळे दिवसभर हा परिसर पर्यटकांमुळे बहरला होता.
फोटो : ०६१२२०२०-कोल-अंबाबाई दर्शन
फोटो ओळी : कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी रविवारी दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे भवानी मंडप व मंदिराबाहेरील परिसर फुलला होता.
छाया : नसीर अत्तार