गडहिंग्लज : शोषण आणि टोकाच्या आर्थिक विषमतेच्या गर्तेत देश सापडला असून न्यायसंस्था कोलमडली आहे. तिला सक्षम करण्याचे काम अन्य तीन स्तंभ करीत नसून जनताही सुस्त आहे. त्यामुळे देशात लोकशाही केवळ मतदानापुरतीच शिल्लक असल्याचा घणाघाती आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केला.नगरपरिषदेच्या साने गुरूजी वाचनालयाच्या लोकशिक्षण व्याख्यानमालेच्या सातव्या दिवशी समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईटे होते. कोळसे-पाटील म्हणाले की, जगाच्या मानव विकास निर्देशांकात भारत मध्यावर असला तरी आदिवासी, दलित आणि मुस्लिम समुदायाचा निर्देशांक जगाच्या नीचतम निर्देशांकाहून कमी आहे, पण जगातल्या १०० श्रीमंतांच्या यादीत भारताचे ५० लोक आहेत. देशातल्या मूठभर उद्योगपतींकडे ९०% संपत्ती एकवटली असून, शासन ही आर्थिक विषमता कमी करण्यासाठी कुचकामी असल्याचे सांगितले.प्रास्ताविक किरण कदम यांनी केले. अशोक कोळी आणि स्वाती कळेकर यांना साने गुरूजी आदर्श वाचक, अशोक शेरेकर यांना सानेगुरूजी आदर्श शिक्षक, जयश्री दानवे यांच्या कलायात्री या चरित्र गं्रथाला सानेगुरूजी साहित्य आणि प्रा. विठ्ठल बन्ने यांना नरेंद्र दाभोळकर कृतज्ञता सामाजिक चळवळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. दत्ता देशपांडे, के. बी. केसरकर आणि सदानंद वाली यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार झाला. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
देशात लोकशाही मतदानापुरती
By admin | Updated: December 26, 2014 00:53 IST