कोल्हापूर : दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री कारखान्याचे संचालक प्रदीप शिवाजी पाटील (रा. मोरेवाडी, ता. भुदरगड) यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शामराव भोई यांनी सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे केली आहे.
या कारखान्याची निवडणूक ऑक्टोबर २०१७ ला झाली. या निवडणुकीत प्रदीप पाटील हे भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून विजयी झाले. परंतु पाटील यांनी निवडणूक अर्जासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याने त्यांना अपात्र करावे, अशी तक्रार भोई यांनी केली आहे. भोई हे पाटील यांच्याविरोधात पराभूत झाले होते.
प्रदीप पाटील हे कारखान्याचे अ वर्ग सभासद नाहीत. पाटील यांनी मंजूनाथ स्वयंरोजगार विकास संस्था आकुर्डे या संस्थेचे सभासद नसतानाही सभासद असल्याचे बनावट पत्र अर्जासोबत जोडले आहे. ते भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून निवडून आले असले तरी त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र न जोडता पडताळणी विभागाचे टोकन जोडले आहे. अद्याप त्यांनी मुदतीत जातीचा दाखला व प्रमाणपत्र दिलेले नाही. निवडणूक नियमाप्रमाणे पाटील हे मंजूनाथ स्वयंरोजगार विकास संस्थेचे संचालक अथवा ठरावधारक नाहीत.
यामुळे त्यांना संचालक पदावर राहण्याचा अधिकार नाही. या सर्व मुद्यांचा विचार करून आणि कागदपत्रांची तपासणी करून त्यांना बिद्री कारखान्याच्या संचालकपदासाठी अपात्र ठरवावे, असे तक्रारीत म्हटले आहे.