राधानगरी : डिग्रस (ता. राधानगरी) येथील मतिमंद व अपंग तरुणाचे अपहरण झाल्याची फिर्याद काल, मंगळवारी राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी केलेल्या तपास मोहिमेत दहा किलोमीटर अंतरावरील एका नातेवाइकांच्या घरात हा तरुण झोपलेला आढळला. मात्र, स्थानिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केल्यावर फिर्यादीबाबत संशयास्पद स्थिती असल्याचे पोलिसांनी व्यक्त केले.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राधानगरी अभयारण्यात दाजीपूरपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील डिग्रस येथील बाळू बाबू कोकरे यांनी त्याचा मतिमंद, अपंग व मुकबधीर असलेला भाऊ राजाराम बाळू कोकरे (वय २४) याचे सोमवारी दुपारनंतर अपहरण झाल्याची फिर्याद काल, मंगळवारी राधानगरी पोलिसांत दिली. यामध्ये गावातीलच एका प्रतिष्ठित व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता.काल सायंकाळी पोलिसांनी तेथे जाऊन ग्रामस्थांसह जंगल व गावाच्या परिसरात शोध घेतला. पोलीस निरीक्षक अनिल गाडे स्वत: यामध्ये सहभागी होते. रात्री दहापर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू होता; पण धागेदोरे लागत नव्हते. यानंतर चर्चेतून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीचा भाऊ नातेवाईक असलेला बाबू धाटू कोकरे यांच्या दहा किलोमीटर अंतरावरील वळवण पैकी ठक्याचा वाडा येथे असल्याचा सुगावा लागला.रात्री अकरा वाजता तेथे जाऊन पाहणी केली असता राजाराम हा तेथे झोपलेला आढळला. पोलिसांनी त्याला राधानगरीत आणून वैद्यकीय तपासणी करून त्याला वडीलांच्याकडे सुपूर्द केले. तो मुकबधीर व मतिमंद असल्याने त्याच्याकडून काहीही माहिती घेता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
डिग्रसमध्ये घडले अपहरणनाट्य
By admin | Updated: July 3, 2014 00:54 IST