चंदगड : पार्ले (ता. चंदगड) येथील रवळनाथ मंदिर व जमिनीचा गुरव कुटुंब व ग्रामस्थ यांच्यात असलेला वाद विकोपाल गेला असून, गुरव कुटुंबीयांचा निषेध करण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ गुरुवारी (दि. २२) गाव सोडणार आहेत. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांना दिले आहे. गाव सोडून चंदगड येथील तहसील कार्यालयासमोर संसार थाटणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.बाळकृष्ण गुरव व दौलत गुरव या दोघा भावांनी ग्रामस्थांच्या विरोधात चंदगड पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार चंदगड पोलिसांनी ६० ग्रामस्थांवर कारवाई केली. सन २०१२ मध्ये पार्ले ग्रामपंचायतीची निवडणूक ग्रामस्थांनी बिनविरोध केली होती. मात्र, बाळकृष्ण व दौलत या दोघा भावांनी ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरले होते. या निवडणुकीत दोघा भावांचा पराभव झाला होता. ग्रामस्थांची २१२ एकर जमीन आहे. त्यापैकी १२ एकर जमीन रवळनाथ मंदिर ट्रस्टच्या नावे आहे. त्यापैकी निम्मी जमीन गुरव कुटुंबीय कसतात. उर्वरित २०० एकर जमिनीतून गेल इंडिया गॅस पाईपलाईन गेल्याने नुकसानभरपाई म्हणून शासनाकडून ३० लाख रुपये मिळाले होते. या निधीतून ग्रामस्थांनी रवळनाथ मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रवळनाथ मंदिर ट्रस्टपैकी गुरव बंधू ट्रस्टी आहेत. त्यांनी बँक खात्यातील पैसे काढण्यास विरोध केला. यावरूनच ग्रामस्थ व गुरव कुटुंबात वाद उफाळून आला. संपूर्ण गावाने आपल्याला वाळीत टाकल्याची तक्रार गुरव कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार ग्रामस्थांवर कारवाई केली. त्यामुळे पार्ले ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या कारणासाठीच ग्रामस्थांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.निवेदनावर तंटामुक्त अध्यक्ष सुधाकर गावे, उपसरपंच संभाजी धाकलू गावडे, शामराव गावडे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)आज तहसील कार्यालयात बैठकदरम्यान, या प्रकरणावर विचारविनिमय करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आमदार संध्यादेवी कुपेकर, जि. प. सदस्य राजेंद्र परीट, सभापती ज्योती पवार-पाटील, जि. प. सदस्य अप्पी ऊर्फ विनायक पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, दिवाकर पाटील, रुद्राप्पा तेली, एम. जे. पाटील, आदींच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयात बैठक बोलविण्यात आली आहे.
पार्ले ग्रामस्थांचा गाव सोडण्याचा निर्णय
By admin | Updated: January 20, 2015 23:35 IST