लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींसाठी आज, सोमवारी तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होत आहे. अत्यंत अटीतटीने निवडणूक झाली असून ३,३०७ जागांसाठी तब्बल ७,६५७ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारांसह समर्थकांच्या नजरा आजच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान झाले. चुरशीने ८३.८० टक्के मतदान झाले होते. उमेदवारांचे गेले दोन दिवस विजयाची गणिते मांडण्यात गेले आहेत. आता निकालाचा दिवस आल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
सकाळी ८ वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीस सुरुवात होणार आहे. सर्वसाधारणपणे मोठ्या गावांसाठी सहा टेबलवर मोजणी होणार असून अर्ध्या तासात गावची मतमोजणी पूर्ण होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात पावणेनऊ वाजल्यापासूनच फटाके व गुलालाची उधळण सुरू होणार आहे. करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी रमणमळ्यात होणार असल्याने कसबा बावडा मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
मिरवणूक काढल्यास थेट गुन्हे
ग्रामपंचायतींच्या निकालानंतर विजयी उमेदवारांचा जल्लोष असणार आहे; मात्र गावातून मिरवणूक काढल्यास संबधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. त्यामुळे विजयाचा आनंद काहीसा संयमानेच घ्यावा लागणार आहे.
फोटो ओळी : कसबा बावडा, रमणमळा येथील शासकीय बहूद्देशीय हॉलमध्ये करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मतमोजणी होत आहे. मोजणी यंत्रणेचा रविवारी आढावा घेण्यात आला. (फाेटो-१७०१२०२१-कोल-इलेक्शन) (छाया- नसीर अत्तार)