कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील तीन फूट गटारीत पडून नाका-तोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू झाला. संभाजी शामराव पाटील (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. रविवारी पहाटे फिरायला गेल्यानंतर पाण्याच्या पाईपलाईनमध्ये पाय अडकून ते तोंडावर रस्त्याकडेच्या गटारीत पडले. हकिकत अशी, संभाजी पाटील हे खासगी वाहनावर चालक होते. गेल्या चार वर्षांपासून ते घरीच होते. नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ते फिरायला गेले असता गटारीत पडले. या मार्गावरून माजी नगरसेवक सचिन खेडकर जात असताना त्यांना गटारीत कोणीतरी पडल्याचे दिसले. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता संभाजी पाटील मृतावस्थेत आढळले. गटारीत पडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे सीपीआर रुग्णालयाच्या डॉक्टरांचा अहवाल आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
लक्षतीर्थमध्ये गटारीत पडून एकाचा मृत्यू
By admin | Updated: January 16, 2017 00:48 IST