कोपार्डे : ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आल्या... घरात आनंदाचे वातावरण असतानाच बुधवारी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मृत्यूने गाठले अन् ग्रामपंचायतीची पायरी चढण्याचे त्यांचे स्वप्नही काळाने हिरावून नेले. नागदेववाडी (ता. करवीर) येथील सखुबाई लक्ष्मण निगडे-निगवेकर (वय ६५) यांचे बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आणि कधीही ग्रामपंचायतीची निवडणूक न लढविणाऱ्या घराला संधी देण्यासाठी नागदेववाडी (ता. करवीर) येथील सखुबाई लक्ष्मण निगडे-निगवेकर यांना संधी देण्यात आली. प्रभाग क्रमांक १ मधून काँग्रेसप्रणित महालक्ष्मी ग्रामविकास आघाडीतून त्या तब्बल ४० मतांनी निवडून आल्या होत्या. मात्र, ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्याची संधी मिळण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीची पायरी चढण्याअगोदरच महिला सदस्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST