कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील डी.सी.पी.एस. कर्मचाऱ्यांचा हिोब अजूनही अपूर्ण आहे. यासाठी गेली दोन वर्षे मागणी केली जात आहे; परंतु अजूनही याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ही रक्कम एन.पी.एस.कडे वर्ग करण्यात आलेली नाही. तेव्हा लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची तक्रार निवारण सभा मंगळवारी पार पडली. यामध्ये या हिशेबाबाबत जोरदार चर्चा झाली. सुरुवातीला पंचायत समिती चंदगडकडील वरिष्ठ सहा. विलास चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचा सर्व संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा हिशेब पूर्ण करून अद्ययावत पावत्या व सर्व रकमा कर्मचाऱ्यांना मिळतील याचे नियोजन करण्याच्या सूचना चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
समाजकल्याणकडील वेतन व भत्त्यासह मंजूर असलेल्या पदावर जि. प.कडील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या कराव्यात, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले त्रुटी पूर्ततेसाठी परत पाठवली आहेत. या बिलांच्या तांत्रिक मान्यता ना देय रकमामुळे पुन्हा घ्याव्या लागणार आहेत . त्यामुळे ही देयके मंजूर होण्यास विलंब होत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे तांत्रिक मान्यता मिळालेल्या देयकांना विनाविलंब प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
वाहनचालकांना गणवेश अनुदान मिळावे, रुग्णवाहिकांचा विमा उतरावा, आरोग्य विभागाकडील विस्तार अधिकारी आरोग्य ३ पदे अद्याप पुनर्जीवित करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पदोन्नतीमध्ये अन्याय होत आहे. ही पदे भरावीत, आदी मागण्या करण्यात आल्या. प्रत्येक विभागप्रमुखाने या मागण्या मार्गी लावाव्यात अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या. बैठकीत कर्मचारी महासंघ अध्यक्ष सचिन जाधव, अजित मगदूम , कर्मचारी युनियन अध्यक्ष महावीर सोळांकुरे , लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष नीलेश म्हाळुगेकर , सचिन मगर, आरोग्य संघटनेचे कुमार कांबळे, शरद देसाई, प्रवीण मुळीक, संध्या कांदणे, विस्तार अधिकारी जोशी , बांधकाम संघटनेचे बोगांळे, कनिष्ठ अभियंता वाहनचालक संघटनेचे इक्बाल तांबोळी, परिचर संघटनेचे दीपक साठे, रणजित पाटील उपस्थित होते.