कोडोली : वारणा नदीच्या खोऱ्यात बुधवारी रात्री अचानक झालेल्या पावसामुळे नदीस मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून, वारणा नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथे असलेल्या बंधाऱ्यास पालापाचाेळ व लाकूड सामान अडकल्याने नदीच्या पाणीपातळीत आणखीनच वाढ झाली असून, पुगीच्या पाण्यामुळे बंधाऱ्यावर चांगलाच दाब वाढला आहे.
बुधवारपर्यंत हलक्या स्वरूपात असणाऱ्या पावसाने रात्रीचे उग्र रूप धारण करीत नदीच्या परिसरात सर्वत्र मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे अचानक नदीच्या पातळीत वाढ झाली. चांदोली धरणानंतर नदीवर मोठा असलेला बंधारा हा बच्चे सावर्डे येथीलच असल्याने या ठिकाणी कचरा अडकला आहे. त्यामुळे बंधाऱ्यास अडकलेला कचरा कसा काढायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फोटो ओळ : वारणा नदीस आलेल्या पाण्याबरोबर बच्चे सावर्डे येथील बंधाऱ्यास अडकलेला कचरा.