कोल्हापूर : निवडणूक संपूर्ण राज्यात पंचरंगी किंवा बहुरंगी होत असल्याने कार्यकर्त्यांची उपलब्धता हाच सर्वांत मोठा प्रश्न उमेदवारांसमोर आहे. त्यामुळे यंदा अनेक उमेदवारांनी महाविद्यालयीन विद्यार्थांना निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतले आहे. या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी गाडीचा पेट्रोल खर्च, भत्ता, चहा-नाश्ता आणि जेवणाचा खर्च, असे आमिष दाखविण्यातआले आहे. यामुळे कॉलेजला दांडी व प्रचारात उडी असे चित्रदिसत आहे.यंदाची विधानसभा निवडणूक ही सर्व अर्थाने महत्त्वाची ठरत आहे. मतदानासाठी काही दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांची चांगलीच धावपळ सुरू आहे. घरोघरी मतदारांना भेट देण्याचा आणि प्रचारफेरी काढण्याचा सर्वच उमेदवारांनी धडाका लावला आहे. यासाठी कार्यकर्त्यांची फौज लागते. हीच कार्यकर्त्यांची फौज कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मिळत असल्याने यंदाच्या निवडणुकीत कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्याचप्रमाणे पक्ष व उमेदवार कोण, याला महत्त्व न देता ‘पॉकेट मनी’ मिळत असल्याने विद्यार्थी महाविद्यालयीन ग्रुपसोबत प्रचार करताना दिसत आहेत. काही उमेदवारांकडून या विद्यार्थांचा आपली ‘ताकद’ दाखविण्यासाठी मोठ्या खुबीने वापर केला जात आहे.दिवाळीचा खर्च बाहेर...एखादा उमेदवाराचा प्रचार केल्यास इतके पैसे मिळणार आहेत. यासह पेट्रोलचा खर्च वगळता महिनाभरात तीन ते चार हजार रुपयांचा ‘पॉकेट मनी’ मिळणार असल्याने अनेक विद्यार्थी यंदा स्वखर्चाने दिवाळी साजरी करण्यासाठी प्रचारात सहभागी झाले आहेत.राजकारणात रस...काही युवकांना पैशापेक्षा राजकारणात अधिक रस असल्यामुळे प्रचारात सहभागी झाले आहेत. काही युवकांना राजकारणातच करिअर करायचे असल्याने त्यांनी पहिल्यापासून कॉलेजमध्ये आपला एक ग्रुप तयार केला आहे. ती ताकद या निवडणुकीत वापरत आहेत. ही कामे.....प्रसिद्धीपत्रकांचे वाटप, घरोघरी जाऊन पक्ष व उमेदवारांचे महत्त्व पटवून देणे, सोशल नेटवर्किंग साईटस्द्वारे प्रसिद्धी आणि सभा-बैठकांसाठीची तयारी, अशी विविध कामे हे विद्यार्थी करीत आहेत.
कॉलेजला दांडी, प्रचारात उडी!
By admin | Updated: October 10, 2014 00:16 IST