भादोले : वाहनांच्या नंबरप्लेटबाबत शासनाने कितीही नियम व अटी घातल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून बिनधास्तपणे फॅन्सी नंबरप्लेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. वडगाव परिसरात अशा नंबर प्लेटचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक युवकांनी नियम धाब्यावर बसवून फॅन्सी नंबरप्लेटचा बिनधास्तपणे वापर केला आहे.वाहनांची ओळख व्हावी, त्याची सरकारी नोंद व्हावी म्हणून प्रत्येक वाहनाला क्रमांक दिलेला असतो. हा क्रमांक विशिष्ट पद्धतीने तयार करून तो वाहनावर लावणे बंधनकारक आहे; पण सध्या फॅशन आणि नेतेगिरीच्या युगात अशा नंबरप्लेट जणू काही नेमप्लेट झाल्या आहेत. वडगाव परिसरातील युवकांमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांवर अशा नंबरप्लेटची क्रेझ वाढली आहे. आपली एखाद्या विशिष्ट नेते, कार्यकर्ता किंवा संघटनेबद्दल अस्मिता व्यक्त करण्यासाठी ‘दादा, तात्या, मामा, डॉन, सरपंच, तुमच्यासाठी काय पण, बघतोस काय रागानं...’ अशा विविध नावांचा, वाक्यांच्या प्लेटचा सर्रास वापर केला गेला आहे. शासनाच्या सुरक्षित नंबरप्लेटचे नियम डावलून मोटारसायकलच्या नंबरप्लेटवर नंबरप्लेटच न लावता तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे नंबरप्लेट न लावता बिनधास्तपणे युवक आपल्या दुचाकी पळवत आहेत. अशा नियम तोडणाऱ्या दुचाकीस्वारांना वाहतूक प्रशासनाचा जरब आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चित्रविचित्र नंबर प्लेट, कर्णकर्कश हॉर्न लावून अनेक दुचाक्या भरधाव वेगाने चालविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. यामध्ये युवा, कॉलेजवर्गाची संख्या जास्त आहे. निष्काळजीपणे व भरधाव वेगाने दुचाकी चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या दुचाकीस्वारांना नियम व शिस्तीचा धाक बसविण्यासाठी नंबरप्लेट, वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच गाडीची कागदपत्रे जवळ नसल्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)कशी असावी नंबर प्लेट...वाहनांच्या नंबर प्लेटा कशा असाव्यात, यासाठी आरटीओ कार्यालयाचे काही नियम आहेत. त्याप्रमाणेच नंबरप्लेट असाव्यात अशी अट असते.चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेटवर अक्षर आणि आकड्यांची उंची ६५ एमएम, रुंदी १० एमएम असावी.नंबर हा इंग्रजीमध्ये टाईम्स रोमन फाँटमध्ये असावा. दुचाकीच्या क्रमांकांमध्ये अक्षरांची उंची ३० एमएम, रुंदी ७ एमएम असावी. आकडे देखील याप्रमाणे असावेत. पुढील नंबरप्लेटवर व मागील नंबरप्लेटमध्ये अक्षर आणि आकड्यांच्या उंचीत १० एमएमचा फरक असावा.नंबरप्लेट पांढरी आणि त्यावरील अक्षर, आकडे काळे असावेत.व्यावसायिक वाहनाची नंबरप्लेट पिवळी आणि काळी असावी.
‘दादा, नाना, तात्या’ सुसाट
By admin | Updated: November 10, 2014 00:42 IST