कोल्हापूर : एक वर्षाच्या बाळाच्या अन्ननलिकेत अडकलेली साडीपिन काढून त्याला वाचविण्यात सीपीआरच्या डॉक्टरांच्या पथकाला गुरुवारी यश आले. त्याच्यावर अतितातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. लहान मुलांना घरात इतस्तत: पडलेल्या वस्तूंपासून सांभाळणे किती महत्त्वाचे असते हेच या घटनेवरून स्पष्ट झाले.
पुलाची शिरोली (ता.हातकणंगले) येथील एक वर्षाच्या बाळाने काही तरी गिळल्याने त्याला बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता सीपीआरमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. साडेपाचच्या दरम्यान त्याने काहीतरी गिळल्याचे पालकांनी सांगितले. बालरोगशास्त्र विभाग व कान, नाक, घसाशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी एक्सरे काढला तर अन्ननलिकेत काहीतरी अडकल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बाळाच्या जीवाला धोका असल्याने रात्री साडेदहा वाजता बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या शस्त्रक्रियेनंतर या बाळाने साडीची पिन गिळल्याचे स्पष्ट झाले. बाळाची तब्येत ठीक असून त्याला लहान मुलांच्या कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. कान, नाक, घसाशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वासंती पाटील, डॉ. स्नेहल सोनार, डॉ. विनायक रायकर यांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉ. आरती घोरपडे आणि भूलशास्त्र विभागाच्या डॉक्टर्सनी सहकार्य केले.
१६०९२०२१ कोल१/२
कोल्हापुरातील बालकाने गिळलेली आणि एक्सरेमध्ये दिसणारी हीच ती साडी पिन