इचलकरंजी : येथील एका काच व्यापाऱ्याला बोलावून घेऊन त्याला धमकी देऊन दुचाकी व मोबाईल काढून घेतल्याप्रकरणी येथील शिवाजीनगर पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. दरोडा व वाटमारी करणाऱ्या या टोळीकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.प्रवीण सतीश जाधव (वय २३, रा. थोरात चौक), तोहित अर्शद सावनूरकर (२३), अमीर मुबारक निपाणीकर (२२, दोघे रा. विक्रमनगर), मोहसीन सिकंदर मोमीन (२५, रा. कृष्णानगर), सागर संजय माळी (२०, रा. दत्तनगर) व अजित रावसाहेब तिप्पे (२३, रा. जुना चंदूर रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील पहिले तीन संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, १९ डिसेंबर २०१४ रोजी फजल शेख या काचेच्या व्यापाऱ्याला फोन करून आमच्या साईटवर काचेचे काम करायचे आहे. तुम्ही साईटवर या, असे सांगून पंचगंगा फॅक्टरीजवळील गॅस पंपावर बोलावून घेतले. तेथून दुचाकीवरून शेख यांना पंचगंगा फॅक्टरीच्या मागील बाजूस घेऊन त्यांची दुचाकी व मोबाईल असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला आणि पलायन केले. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री वरील सहा आरोपींना अटक केली आहे. (प्रतिनिधी)
दरोडा, वाटमारीची टोळी गजाआड
By admin | Updated: January 15, 2015 00:35 IST