कसबा बावडा : गेल्या ३६ वर्षांपासून उत्कृष्ट व गुणवत्तावपूर्ण शैक्षणिक परंपरेतून हजारो अभियंते घडविणाऱ्या कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाला युजीसी, नवी दिल्ली व शिवाजी विद्यापीठ यांच्याकडून नुकताच स्वायत्त संस्थेचा (ऑटोनोमस ) दर्जा प्राप्त झाला आहे, अशी माहिती कॉलेजचे विश्वस्त, आमदार व ऋतुराज पाटील व कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे उपस्थित होते. या स्वायत्त महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासूनचे प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर पदवीचे प्रवेश केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेनुसार होणार आहेत.
पाटील म्हणाले, स्वायत्तता दर्जामुळे डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजची महाराष्ट्रात वेगळी ओळख असणार आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ मध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेची कसबा बावडा येथे स्थापना केली. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असून ''''नॅक''''ची ''''ए'''' श्रेणी प्राप्त आहे. या महाविद्यालयाला युजीसीच्या उच्च स्तरीय समितीने ३० व ३१ ऑक्टोबर रोजी भेट दिली होती. महाविद्यालयातील सोयी-सुविधा व अन्य बाबींची पाहणी करून युजीसीने १० वर्षांसाठी महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा दिला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांनी या वर्षापासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी व एम. टेक.चे प्रवेश स्वायत्त संस्था म्हणून करण्यास महाविद्यालयाला परवानगी दिली असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
चौकट:
आर्किटेक्चरला स्वायत्तता...
महाविद्यालयातील आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमालाही युजीसी, नवी दिल्ली व शिवाजी विद्यापीठ यांच्याकडून स्वायत्त संस्थेचा अभ्यासक्रम म्हणून दर्जा देण्यात आला आहे. आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाला स्वायत्त संस्थेच्या अभ्यासक्रमाचा दर्जा मिळवणारे डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.
चौकट :
दोन नवे अभ्यासक्रम....
बी. ई. कॉम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग व बी. ई. कॉम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन इन डेटा सायन्स या दोन नव्या अभ्यासक्रमांना AICTE नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन व शिवाजी विद्यापीठ यांची मान्यता मिळाली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ६० प्रवेश क्षमता असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
चौकट:
स्वतंत्र अभ्यासक्रम विकसित....
स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाल्याने महाविद्यालयाने स्वत:चा स्वतंत्र अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, गुणांकन पद्धती विकसित केली आहे. औद्योगिक मनुष्यबळाच्या मागणीनुसार सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उद्योजकीय अनुभव मिळावा यासाठी महाविद्यालयाने ५० पेक्षा जास्त उद्योजकांसोबत सामंजस्य करार केला आहे.