कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सोवरेन गोल्ड बॉँड योजनेला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या संबंधित योजनेला नवीनपणा आणि प्रबोधनाच्या कमतरतेचा फटका बसत आहे.गेल्या महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने सोवरेन गोल्ड बॉँड योजना सुरू केली आहे. यात एक, दोन आणि दहा ग्रॅम सोन्याचे बॉँड खरेदी केल्यानंतर त्यावर २.७५ टक्के व्याज दिले जाते. तसेच ग्राहकांनी आपल्याजवळील सोने बँकेत ठेवल्यास त्यावर २.२५ टक्के व्याज दिले जाते. आरबीआय व भारतमातेची मुद्रा असलेली दोन ग्रॅमच्या सुवर्णनाण्यांची विक्री केली जाते. कर्ज घेण्यासह शेअर बाजारातील व्यवहार करताना संबंधित योजनेतील बॉँड हे उपयुक्त ठरणारे आहेत. व्यावसायिक बँकांसह पोस्ट कार्यालयात दर महिन्यातील ठरावीक दिवसांमध्ये योजना राबविण्यात येते. गेल्या महिन्यातील योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा अग्रणी व्यवस्थापक एम. जी. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, केंद्र सरकारची संबंधित योजना उपयुक्त ठरणारी आहे. जिल्ह्यातील विविध व्यावसायिक बँका, पोस्ट कार्यालयांत संबंधित योजना राबविण्यात येत आहे. योजनेचे नियंत्रण जिल्हा अग्रणी बँकेकडे येत नाही. मात्र, काही बँक अधिकारी, बँकिंग क्षेत्रातील लोकांकडून सांगितले जात आहे की, योजना सुरू होऊन अवघा एक महिना झाला आहे. शिवाय याबाबतची माहिती अजून ग्राहकांपर्यंत पोहोचली नसल्याने बँकांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. योजनेचा प्रतिसाद वाढविण्याबाबत बँका प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
‘सोवरेन गोल्ड’ला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद
By admin | Updated: December 10, 2015 00:56 IST