लोकमत न्यूज नेटवर्क खोची : ज्या जिद्दीने कारखान्याच्या उभारणी झाली तेवढ्याच आत्मविश्वासाने कारखाना सक्षमपणे चालविला आहे. उभारणीच्या सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी चिंता व्यक्त केली ते आता आदर्श कारभार व गतिमान प्रगती पाहून थक्क होऊन कौतुक व्यक्त करतात. कारखान्याचा १३ मेगावॅट सहवीज निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वयित झाला आहे. वाढीव १५ मेगावॅटसह एकूण २८ मेगावॅटचा प्रकल्प नजीकच्या सुरू करण्यात येईल. डिसेंबर पर्यंत डिस्टलरी प्रकल्प पूर्ण होऊन उत्पादन सुरू होईल. तर येत्या दोन वर्षात कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता वाढवून १० हजार टन क्षमता करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी दिली.
नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने शरद इन्स्टिट्यूटमध्ये झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. आभार डी. बी. पिष्टे यांनी मानले.
मंत्री यड्रावकर म्हणाले, केंद्राच्या चुकीच्या साखर धोरणामुळे साखर कारखानदारी अडचण येत चालली आहे. एफआरपीत वाढ होते पण साखर दरात झपाट्याने घसरण होऊन दर २,९०० पर्यंत खाली येतो. साखरेचा हमीभाव ३,१०० रुपये आहे. तो वाढवीला पाहिजे. पूर्वी कारखान्याचा हंगाम १७०-१८० दिवस चालायचा. आता तो १३० दिवसापर्यंत येऊन गाळपाचे दिवस कमी झाले आहेत. याचा परिणाम उत्पादन खर्चावर होऊ लागला आहे. यासाठी गाळप विस्तार वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गत हंगामात सव्वा सहा लाख टन उसाचे गाळप करून एफआरपी प्रमाणे प्रतिटन २,८२९ रुपये अदा केले आहेत. येणाऱ्या हंगामात सर्वोत्तम उताऱ्यासह साडेसात लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.
यावेळी अहवाल वाचन मुख्य कार्यकारी बी.ए. आवटी प्रास्ताविक संचालक सुभाषसिंग रजपूत यांनी केले. श्रद्धांजलीचा ठराव संचालक रावसाहेब भिलवडे यांनी मांडला.
सभेस उपाध्यक्ष थबा कांबळे, उपनगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर), युवा नेते आदित्य पाटील (यड्रावकर) संचालक अप्पासाहेब चौगुले, लक्ष्मण चौगुले, शिवगोंडा पाटील, गुंडा इरकर, रविकांत कारदगे, अण्णासो सुतार, संजय नांदणे, अजित उपाध्ये, संजय बोरगावे, प्रकाश अकिवाटे, प्रकाश लठ्ठे, सी.बी. बिरनाळे, आर.बी. पाटील, दीपक पाटील, एस.एस. वावरे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
चौकट १) ३०० बेडचे हॉस्पिटल उभारणार
शिक्षण क्षेत्रात ही यड्रावकर उद्योग समूहाने गुणात्मक व दर्जेदार प्रगती केली आहे. सर्वसामान्य गोरगरिबांना तसेच शेतकरी, कामगार यांना चांगल्या आरोग्य सुविधा तसेच अल्पदरात वैद्यकीय सेवा देण्यासाठी लवकरच ३०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल उभे करण्यात येईल तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी एमबीबीएस, नर्सिंग कॉलेजही सुरू करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मंत्री राजेंद्र पाटील यांनी केली.
२) मयत पाच कामगारांच्या कुटुंबीयांना कामगारांचा एक दिवसाचा ३ लाख ६ हजाराचा पगार व त्यामध्ये कारखान्याचे ३ लाख ६ हजार असे मिळून ६ लाख १२ हजार रुपये मदतीचा धनादेश घरपोच देण्यात येणार आहे, असेही यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितले.
फोटो ओळी-नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या वार्षिक सभेत आरोग्य मंत्री, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी थबा कांबळे, संजय पाटील (यड्रावकर), सुभाषसिंग रजपूत, शिवगोंडा पाटील, डी.बी. पिष्टे, रावसाहेब भिलवडे, प्रकाश पाटील, अप्पासाहेब चौगुले उपस्थित होते.(छाया-अनंतसिंग)