लोकमत न्यूज नेटवर्क
किणी : वारणा नदीत मगरींचा तर शेतामध्ये तरसाचा वावर असतानाच आता गव्यांचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.
वारणा नदी बारमाही दुथडी भरून वाहात असल्याने बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे तर सर्वाधिक ऊसाचे क्षेत्र आहे. साहजिकच वारणा नदीतूनच शेतीला वीजपंपद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी नदी काठावर मोठ्या संख्येने विद्युत मोटारपंप बसविण्यात आले आहेत. रात्री वीजपुरवठा सुरू असताना शेतकऱ्यांना विद्युत मोटारपंप सुरू करण्यासाठी नदीकाठी व शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यातच ऊसतोडणी हंगाम सुरू असल्याने रात्रीच्यावेळी ऊस भरण्यासाठी वाहन आले तर मजुरांना व शेतकऱ्यांना जावे लागते. मात्र, आधीच वारणा नदीत मगरींचा वावर आहे तर गेल्यावर्षी तरसाचा वावर होता. तरसाने चावरे येथील शेतामधील शेळ्यांवर हल्ला केला होता. तर किणी येथे मगरीची पिल्ले नदीकाठच्या ओगळीत सापडली होती. त्यांना तरूणांनी व वन विभागाने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले होते. मगर, तरसासह आता गव्यांचाही वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रात्री शेतात जाताना दोनहून अधिक शेतकऱ्यांनी काठी आणि बॅटरी घेऊनच जावे. यामुळे गवे निघून जातात. त्यांना हुसकावून लावू नये. तसे केल्यास ते बिथरण्याची शक्यता असते. गवे दिसल्यावर सतर्क राहून वन विभागाला कळवावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.