कोल्हापूर : येथील मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून मंगळवारी शाहूपुरी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली. अनिल बाबूराव तावडे (वय ४० रा. सरवडे, ता. राधानगरी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या अंगझडतीत ६० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस सापडले.
ग्रामपंचायत आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले. त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी मोहीम प्रत्येक पोलीस ठाण्याने हाती घेतली आहे. दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दिग्विजय चौगुले आाणि प्रशांत घोलप यांना मार्केट यार्डमध्ये एक सराईत गुन्हेगार विनापरवाना पिस्टल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्यासह सहकाऱ्यांनी मार्केट यार्ड येथे सापळा लावला. त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल तावडे हा परिसरात येताच त्याला पकडले, त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ६० हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस सापडले. याप्रकरणी अनिल तावडे याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
फोटो नं. १२०१२०२१-कोल-शाहूपुरी पोलीस०१
ओळ : विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस बाळगणारा सराईत गुन्हेगार अनिल तावडे याला शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
फोटो नं. १२०१२०२१-कोल-शाहूपुरी पोलीस०२
ओळ : जप्त केलेले पिस्टल व जिवंत काडतूस