कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियमची दुरवस्था झाल्याने कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला हक्काचे असे एकही मैदान नव्हते. त्यामुळे असोसिएशनने राजाराम महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन (पाॅलिटेक्निक) या दोन महाविद्यालयांशी सामंजस्य करार केला. या करारानुसार या महाविद्यालयांची मैदाने केवळ क्रिकेटसाठी तयार केली जात आहेत. नव्या क्रिकेट हंगामाची सुरुवात याच मैदानावरून नोव्हेंबरमध्ये हाेणार आहे.
छत्रपती शिवाजी स्टेडियमची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन गेली पाच वर्षे या राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर स्थानिक ते निमंत्रित व राज्यस्तरीय क्रिकेट सामने खेळविले. हा करार नुकताच संपला. पुन्हा नव्याने महाविद्यालयाशी पाच वर्षांचा करार केला आहे. त्यात मैदानामध्ये ८ वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या तयार करण्याचे काम सुरू आहे, तर याच मैदानाजवळील शासकीय तंत्रनिकेतनचे मैदान आहे. याही मैदानासाठी असोसिएशनने तंत्रनिकेतनशी तीन वर्षांचा सामंजस्य करार केला आहे. येथेही पाच खेळपट्ट्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन्ही ठिकाणी खेळपट्टीसह हिरवळ (आऊट फिल्ड) तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी क्युरेटर म्हणून केडीसीएचे संचालक नितीन पाटील सातत्याने कार्यरत आहेत. या मैदानांमुळे स्थानिकसह राज्यस्तरीय निमंत्रितांचे व इतर निवड चाचणी स्पर्धा, निवड चाचणीचे १५ दिवसांचे शिबिरही घेता येणार आहे. या मैदानांकरिता अर्थमूव्हिंग मशिनरी ओनर्स असाेसिएशनचे रवींद्र पाटील-सडोलीकर, माजी सहसचिव अरुण हत्ती, सुनील पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
अशी होणार मैदाने
दाेन्ही मैदाने आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे हिरवळ (आऊटफिल्ड) केले जात आहे.. राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर एकूण ५ खेळपट्ट्या असणार आहेत. यातील एक सरावासाठी व अन्य चार सामन्यांकरिता, तर पाॅलिटेक्निक मैदानावर एकूण तीन खेळपट्ट्या असून, एक सरावासाठी असेल. याशिवाय १२ व १४ वर्षांखालील मुले व महिलांकरिता बंदिस्त ॲस्टोटर्फ विकेटही केली जाणार आहे. अशा एकूण १३ खेळपट्ट्या आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे आकार घेत आहेत.
फोटो : २५०९२०२१-कोल-राजाराम ०१,
आेळी : कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातील मैदानावर खेळपट्टी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
फोटो : २५०९२०२१-कोल-राजाराम ०२
आेळी : कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातील मैदानावर खेळपट्टीसह मैदान सपाटीकरणाचेही काम वेगाने सुरू आहे.