पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले येथील एन. डी. चौगुले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स संचलित कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात बीएस्सी शुगर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाकडून मान्यता मिळाली आहे. मान्यतेचे पत्र नुकतेच राज्य शासनाकडून महाविद्यालयास प्राप्त झाले. अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रा. एन. डी. चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण भागातील मुलां-मुलींना व्यावसायिक शिक्षणाची सोय होण्याच्या दृष्टीने संस्थेने फूड ॲंड टेक्नाॅलाॅजी हा अभ्यासक्रम यापूर्वी सुरू केला. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता संस्थेने बीएस्सी शुगर टेक्नाॅलाॅजी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. साखर कारखान्यांना तज्ज्ञ मनुष्यबळ पुरविणारा हा व्यावसायिक अभ्यासक्रम असून, १२ सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. साखर उत्पादनाच्या आधुनिक पद्धती, साखर व साखरेशी संबंधित उपपदार्थ (इथेनॉल, अल्कोहोल, टेट्रापॅकमधील उसाचा रस) निर्मितीख उसाच्या गाळपानंतर बाहेर पडणाऱ्या भुशापासून कागदाची निर्मिती याची माहिती या अभ्यासक्रमामध्ये दिली जाते. साखर कारखान्यातील विविध प्रकारच्या मशिनरी तसेच वॉटर प्लांट मॅनेजमेंट इत्यादींचा या अभ्यासक्रमात समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.