कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथे मायलेकीवर गोळीबार केल्याप्रकरणी तरुणाच्या पत्नीला शनिवारी पहाटे करवीर पोलिसांनी अटक केली. अर्चना ऋषीकेश कोळी (वय ३०, रा. मगदूम कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. दरम्यान, अटक केलेले ऋषीकेश बाबूराव कोळी व त्याची पत्नी अर्चना यांना न्यायालयाने दि.२१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, जखमी माय-लेकीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. हा प्रकार प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा परिसरात आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाचगाव येथील मगदूम कॉलनीतील ऋषीकेश कोळी या विवाहीत तरुणाला शुक्रवारी सकाळी एका तरुणीने मोबाईलवर मेसेज पाठवला. पण तो मेसेस त्याची पत्नी अर्चना कोळी हिने पाहिला. त्यावरुन पत्नीने त्या तरुणीला फोन करुन शिवीगाळ केली. त्यानंतर त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ते कळंबा तलावाजवळील सांस्कृतिक कार्यालयनजीक आले. त्यावेळी अर्चना कोळी यांची त्या तरुणीशी व तिच्या आईशी वादावादी झाली. या प्रकरणामुळे संतापलेल्या ऋषीकेश कोळी याने आपल्याकडील बंदूकीने त्या तरुणीवर गोळीबार केला. त्यातील छरे तरुणीसह तिच्या आईला लागल्याने दोघीही गंभीर जखमी झाल्या. गोळीबार प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ माजली.
दरम्यान, पोलिसांनी दुपारी ऋषीकेश कोळी याला अटक केली. तर शनिवारी पहाटेच्या सुमारास त्याची पत्नी अर्चना यांना अटक केली. या दोघांनाही दुपारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.