लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अतिवेगवान वाहने चालविल्यामुळे अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. या वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात पोलीस दलाला ‘स्पीडगन व्हॅन’ दिली आहे. गेल्या दीड वर्षात या स्पीडगन व्हॅनने अनेक वाहनांचे स्पीड रोखले. वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक वाहनास एक हजार रुपये दंड केला जातो. विशेषत: महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना दंड भरावा लागला आहे. गेल्या नऊ महिन्यांत महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १६ हजारांहून अधिक वाहनांना तब्बल दीड कोटी रुपयेहून अधिक रकमेचा दंड भरावा लागला आहे.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात १९ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘स्पीडगन व्हॅन’ दाखल झाली. त्याचे नियंत्रण वाहतूक शाखेकडे देण्यात आले आहे. ही ‘स्पीडगन व्हॅन’ची तात्रिक माहिती समजावून घेण्यात तब्बल दोन महिने गेले. त्यानंतर ही व्हॅन तितकेच जोमाने कामाला लागली. स्पीडगन व्हॅन सेवेत दाखल होऊन कामाला लागल्यानंतर पहिल्याच महिन्यात जानेवारी २०२० मध्ये तब्बल १९९६ वाहनांचा वेग नियंत्रणात आणण्यात यश आले. २०२० या वर्षभरात कोरोनामुळे या व्हॅनच्या कार्यपद्धतीला काहीसा ब्रेक लागला असला, तरीही त्या वर्षात वेगमर्यादेची उल्लंघन करणाऱ्या ४३५४ वाहनांना दंड करण्यात आला. तर जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या नऊ महिन्यांत तब्बल १६ हजार १०१ वाहनाचा वेग या ‘स्पीडगन व्हॅन’ने रोखला आहे. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ६१ लाख रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल केले आहेत.
महामार्गावर महिन्यातील दंड
जानेवारी - १८,८५,०००
फेब्रुवारी- १८,३७,०००
मार्च - ३०,५०,०००
एप्रिल - १६,३८,०००
मे - १३,२२,०००
जून - २३,७९,०००
जुलै - २०,३७,०००
ऑगस्ट - १९,५३,०००
धावत्या गाडीचा मोजला जातो वेग
महामार्गावर अगर मोठ्या रस्त्यावर किमान एक कि. मी. अंतरावरूनही धावत्या वाहनांचा वेग निश्चित करून ते वाहन ‘स्पीडगन व्हॅन’ टिपते. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ‘स्पीडगन’मधून लेझर किरण पाडून त्याची वेगमर्यादा मोजली जाते. त्यामुळे असे अतिवेगवान वाहन थांबवण्याची आवश्यकता भासत नाही. अशा पद्धतीने दंडात्मक कारवाईला सामोरे गेल्यानंतर पुढच्या टप्प्यात वाहनांचा वेग मर्यादित ठेवला जातो. वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य दुर्घटनांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
एसएमएसवर मिळते नोटीस
लांब पल्ल्याच्या अंतरावरून वेगाने येणारे वाहन ‘स्पीडगन’द्वारे निश्चित करून त्याचा वेग उल्लंघन करणारा नमूद झाल्यास, त्या वाहन मालकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर दुसरे दिवशी वाहनाच्या छायाचित्रासह दंडाची नोटीस ई-चलन एसएमएसद्वारे पाठवली जाते.