कोल्हापूर : पेट्रोल, डिझेलच्या आतापर्यंतच्या उच्चांकी भाववाढीमुळे मालवाहतूकदार अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. अडीच किलोमीटरच्या अंतरासाठी ८८ रुपये खर्च करावे लागत आहेत. परवडत नसतानाही केवळ थांबवता येत नाही, माल घेऊन ट्रक धावत आहेत; पण त्यांचे दर दिवसाचे नफ्या-तोट्याचे गणितच पुरते विस्कटून गेले आहे. त्यामुळेच पेट्रोल ७० आणि डिझेल ६० रुपये प्रतिलिटर करा, उपकर निम्म्याने कमी करा; नाही तर मालवाहतुकीच्या भाड्यात ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ करणे अपरिहार्य राहील, असा इशाराच दिला आहे.
इंधनाचे दर वाढले की, त्यावर अवलंबून असणारी मालवाहतूकही वाढते, मालवाहतूक वाढली की त्यातून येणाऱ्या मालाची किंमतही व्यापारी वाढवतो. एकमेकांचा तोटा भरून काढण्यासाठी हे दोन्ही घटक दर वाढवत जातात आणि त्याचा सर्वांत मोठा फटका बसतो, हा आणलेला माल खरेदी करणाऱ्या ग्राहकाला. काल ५० रुपयांपर्यंत मिळणारी वस्तू या वाढीमुळे आणखी किमान २० रुपयांनी वाढते. अशा प्रकारे महागाईच्या चक्रात उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत सर्वच घटक भरडले जात आहेत.
मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचे प्रतिलिटर अडीच किलोमीटर इतके ॲव्हरेज असते. आजचा डिझेलचा दर ८८ रुपये आहे. अडीच किलोमीटरचे अंतर पार करणाऱ्यासाठी ८८ रुपये खर्च करावे लागत आहेत. तेच जर ६० रुपये डिझेल दर असेल तर हा खर्च तब्बल २८ रुपयांनी कमी होतो; पण केंद्र व राज्याने उपकरांच्या माध्यमातून वाढवलेल्या करांच्या बोजाने हे दर आज आवाक्याबाहेर गेले आहेत. दर वाढू लागल्यावर भाड्यात २० टक्के वाढ केली होत; पण ती आता आणखी १५ टक्क्यांनी वाढवली तरच मालवाहतूकदारांचा तोटा काही अंशी कमी होणार आहे.
चौकट०१
दर; तेव्हाचे आणि आताचे
सन २०१४ मध्ये मनमोहन सिंग यांचे सरकार असताना क्रुड ऑईलची किंमत प्रतिबॅरेल १३२ डॉलरवर गेली होती, तरीदेखील पेट्रोल ७० आणि डिझेल ६० रुपये या दराने विक्री होत होते, आता क्रुड ऑईलचा प्रतिबॅरेल दर ६३ रुपये बॅरेल झाले आहे. २०१४ च्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी दर असतानाही सध्या डिझेल ८८ आणि पेट्रोल ९९ रुपयांनी विकले जात आहे. यावर केंद्राचे आणि राज्याचे मिळून ६५ टक्के कर लावण्यात आले आहेत. पेट्रोलचा उत्पादनाचा खर्च ३५, तर डिझेलचा २८ रुपये आहे, तरीदेखील केवळ करांचा भार वाढवून ग्राहकांचा खिसा रिकामा केला जात आहे.
चौकट ०२
जिल्ह्यातील एकूण मालवाहतूक ट्रक : १५ हजार
राज्यांतर्गत लांब शहरात माल घेऊन जाणारे : १० हजार
जिल्ह्यातंर्गत ऊस, बॉक्साईट, धान्य, वाळूसह अन्य मालाची वाहतूक करणारे : ५ हजार ट्रक
चौकट ०३
कोल्हापूरहून बंगलोरला जायचे म्हटले तर पूर्वी २००० हजार खर्च येत होता, तो आता डिझेल दरवाढीमुळे २५०० वर गेला आहे.
प्रतिक्रिया
मात्र पेट्रोलजन्य पदार्थ म्हणून पेट्रोलसह डिझेलचाही समावेश केला तर आपोआपच इतर उपकर कमी होणार आहेत. एक देश - एक कर याचा डंका पिटण्यापेक्षा त्याची सुरुवात पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीमधून केला तर त्याचे चांगले परिणाम दिसतील.
- सुभाष जाधव, उपाध्यक्ष, ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेस