लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. घरोघरी कोरोना लस घ्यायची की नाही, यावर चर्चा सुरू आहे. पण यावर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने एका सहा वर्षीय अनघा अमोल राजमाने रा. उचगाव (ता. करवीर) या मुलीने स्वत: मास्क तोंडावर घालून गुढीलाही मास्क बांधला आणि गुढीनेही कोरोना मुक्तीसाठी मास्कची गरज असल्याचा जणू संदेशच दिला आहे.
राज्यात रेमडेसिविर या कोरोना विरुद्ध लढणाऱ्या औषधांचा सर्वत्र तुडवडा दिसून येत आहे. तर काही ठिकाणी लस तुडवडा जाणवत आहे. संसर्गावर इलाज व बचावासाठी नेहमी साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, तोंडावर मास्क लावणे हे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये या विषाणूचा संसर्ग ज्या पद्धतीने होत आहे ते चिंताजनक आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण सर्वत्र आढळत आहेत. या विषाणूच्या संसर्गाचा धोका घरापासून गल्लीपर्यंत आणि सर्वत्र दिसून येत आहे. पर्यायाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात आहे. म्हणून सर्वांनी या मराठी नूतन वर्षाच्या गुढीकडून कोरोना होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे.
फोटो ओळ: कोरोना मुक्तीसाठी सहा वर्षे अनघा राजमाने हिचा मास्क घालण्याचा गुढीद्वारे संदेश.