कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी कोरोना प्रतिबंधात्मक लसीची शहरवासीयांना प्रतीक्षा लागून राहिली होती. आज, बुधवारी सायंकाळपर्यंत लसीचा पुरवठा झाला, तरच गुरुवारपासून लसीकरण सुरू होईल, असे महापालिका आरोग्य विभागाने सांगितले. १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या १०१ नागरिकांचे मंगळवारी लसीकरण करण्यात आले.
महानगरपालिकेने दिनांक १ मेपासून प्रायोगिक तत्त्वावर भगवान महावीर दवाखाना विक्रमनगर या शासकीय संस्थेच्या ठिकाणी १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात केली आहे. मंगळवारी १९१ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील ६९८ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिका प्रशासनास लस मिळालेली नाही. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण थांबले आहे. अनेक नागरिकांना दुसरा डोस मिळालेला नाही. हा डोस कधी मिळणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
आज, बुधवारी याच वयोगटातील ज्या नागरिकांनी कोविन पोर्टलवर ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतली आहे, अशा नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. संबंधीतांनी यावेळी वेळेत उपस्थित राहण्याचे आहे. ऑनलाईन अपॉईंटमेंट पहिल्या डोसकरिता मर्यादित स्वरूपाची (२०० लाभार्थी प्रति दिवस) आहे. प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण केंद्र शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे.