कोल्हापूर: कोराेना प्रतिबंधासाठी दिल्या जाणाऱ्या कोवीडशिल्ड लसीकरण आता आठवड्यातून चारच दिवस देणार आहे. राज्य शासनाचेच तसे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागाने मंगळवार व बुधवार, शुक्रवार व शनिवार असे वार निश्चित केले असून प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे ११ केंद्रावर लसीकरणाची मोहीम सुरू राहणार आहे.
शनिवारी देशभर कोरोनावरील लसीचा दिमाखात प्रारंभ झाला; पण कोरोना ॲप बंद पडण्याचे आणि लस घेतल्यानंतर काही जणांना रिॲक्शन येण्याच्या घटना घडल्याने रविवारी लसीकरण मोहीम थांबवण्यात आली. कोल्हापुरातही रविवारी लसीकरण बंदच राहिले. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लसीकरण शासन आदेशानुसारच बंद ठेवले आहे, मात्र कोल्हापुरात लस घेतलेल्यांपैकी एकालादेखील कोणताही त्रास जाणवला नाही. शनिवारी जिल्ह्यातील ५७० जणांनी लस टोचून घेतली होती. लसीकरणाानंतर आरोग्य विभागाने त्यांना संपर्क करून काही त्रास जाणवत असल्यास सांगा, अशी विचारणा केली; पण कोणताही त्रास नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, लसीकरणाचे काम चार टप्प्यात पुढील चार महिने सुरूच राहणार असल्याने आरोग्यची सर्व यंत्रणा लसीकरणात अडकून पडू नये म्हणून लसीकरणाचे दिवस कमी करण्यात आले आहेत. यापूर्वी पूर्ण महिनाभर पहिल्या टप्प्यातंर्गत नाेंदणी झालेल्या ३१ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी रोज १,१०० याप्रमाणे लसीकरण करण्याचे नियोजन होते; पण आता आठवड्यातील चारच दिवस लसीकरणाचे असणार आहे. मंगळवार व बुधवार, शुक्रवार व शनिवार या चार दिवशी ठरलेल्या नियोजनाप्रमाणे लसीकरण होणार आहे.
चौकट ०१
लसीकरण केंद्रे
सीपीआर, सेवा रुग्णालय कसबा बावडा, आयजीएम इचलकरंजी, कागल, गडहिग्लज, शिरोळ ग्रामीण रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय, महाडिक माळ, सदर बाजार, पंचगंगा हॉस्पिटल.
चौकट ०२
नकारात्मक प्रचाराला बळी पडू नका
सीपीआरमधील हदयरोग तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी शनिवारी पहिली लस टोचून घेतली. त्यानंतर दिवसभर त्यांचे रुटीन व्यवस्थित राहिले. त्यांनी गुंतागुंतीची ॲन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रियादेखील केली. लसीकरणानंतरचा दिवसही त्यांचा उत्तम गेला. काहीही त्रास जाणवला नसल्याचे त्यांनी सांगितले. नकारात्मक प्रचाराला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.