तालुक्यामध्ये शासनाच्या सहा कोविड सेंटरमध्ये १०२८ बेडची सुविधा असूनही हजारो रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तालुक्यातील रुग्णसंख्या वाढतच आहे. याला गावोगावी फॅमिली डॉक्टरांचे उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांमुळे तालुक्याची रुग्णसंख्या वाढत आहे.
तालुक्यामध्ये ६ सरकारी कोविड सेंटर आहेत. तालुक्यामध्ये ग्रामीणमधील ११५२, तर शहरी ५४४, असे एकूण १६९६ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे.
तालुक्यातील सहा सरकारी कोविड सेंटरमध्ये १०२८ बेड सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये पारगाव ग्रामीण रुग्णालय येथे ३० बेडची सुविधा आहे. हे सर्व ३० ऑक्सिजन बेड आहेत. घोडावत कोविड सेंटर अतिग्रेमध्ये २५० बेड असून, यामध्ये २५ ऑक्सिजन बेड आहेत. इचलकरंजीमध्ये आय.जी.एम. सेंटरमध्ये २६० बेड आहेत. यामध्ये १९० ऑक्सिजन आणि ८ व्हेंटिलेटर बेड आहेत. तात्यासाहेब मुसळे हायस्कूलमध्ये १२२ बेड आहेत, तर व्यंकटेश्वरा हायस्कूल, कबनूर येथे २३६ बेड असून, यामध्ये २८ ऑक्सिजन बेड आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह हातकणंगले येथे १३० बेडची सुविधा असून यामध्ये २० ऑक्सिजन बेड आहेत. तालुक्यामध्ये सहा सरकारी कोविड सेंटरमध्ये एकूण १०२८ बेडची सुविधा आहे.
चौकट
खाजगी दवाखान्यात रुग्णांला त्याची आर्थिक स्थिती पाहून १ लाखापासून ५० हजारांपर्यंत आठ दिवसांचे पॅकेज दिले जात आहे.
मृत्यूचे प्रमाण वाढतेच
खासगी दवाखान्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची सोय नाही. एम.डी. मेडिसिन, तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. तरी ही सेवाभाव या कारणास्तव कोविड सेंटर सुरू केले आहेत. अशा कोविड सेंटरमध्ये शेवटच्या टप्प्यात रुग्ण अत्यवस्थ होतात व शेवटी सरकारी दवाखान्यात हलवतात आणि सरकारी दवाखान्यावरील ताण वाढून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.