उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे कोरोनाने शंभर रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. कोविड रुग्णांची संख्या मोठी असताना देखील ग्रामस्थ नियम पाळण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळले तरच कोरोनाचा प्रतिबंध होऊ शकतो.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचा आलेख वाढत आहेत. शंभरहून अधिक रुग्ण झाले असले तरी अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. कोरोना संसर्ग झालेले पण सौम्य लक्षणे असलेल्यांना गावातील शाळेत अलगीकरण व विलगीकरण करण्यात आले आहे. परंतु लक्षणे असूनदेखील तपासणी न केल्याने रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
गावातील मुख्य बाजारपेठ बंद आहे; पण औद्योगिक वसाहतमधील काही कारखाने सुरू असल्याचे समजत आहे. हे तत्काळ बंद करून सर्वांना सारखे नियम लावावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कंटेन्मेंट झोन मधील ग्रामस्थांचे समुपदेशन करून त्यांना तपासणी करण्यासाठी पाठविणे मुश्किलीचे बनले आहे. ज्याच्या घरातील रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्या घरातील ग्रामस्थांनी बाहेर न पडता अलगीकरणात राहणे गरजेचे बनले आहे.