शिरोळ : येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशहा उरूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. ७ ते १० डिसेंबर दरम्यान हा उरूस उत्सवाचा काळ असून, यावेळी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व पालिका प्रशासनाने गुरुवारी दिला.
शिरोळचा उरूस प्रसिद्ध असून, या उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे हा उरूस रद्द करण्यात आला आहे. याबाबत सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी संघटना, तरुण मंडळे व नागरिक यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. उरूस काळात मंदिर व दर्गा पूर्णपणे बंद राहणार आहे. दर्शनासाठी, नैवेद्य, गलेफ घालण्यास नागरिकांनी मंदिरात जाऊ नये. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. या काळात मिठाई, खेळणी अशी कोणतीही दुकाने टाकली जाणार नाहीत. शिवाय कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. उरूस काळात मंदिर व दर्गा परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी यावेळी सांगितले.
कोट - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशहा उरूस भाविकांनी आपल्या घरीच उत्सवाचा विधी करून साजरा करावा.
- अमरसिंह पाटील, नगराध्यक्ष शिरोळ