बेळगाव : येळ्ळूर गावाच्या वेशीवर डौलाने उभा असलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ हा फलक कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निमित्त पुढे करून काढून टाकला. यानंतर हा फलक २४ तासांच्या आत पुन्हा उभा करण्यात आला. मात्र, हा फलक पुन्हा लावल्याने कर्नाटक पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीहल्ल्यात अनेकजण जखमी झाले होते. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत; पण येळ्ळूरमध्ये तणाव असला तरी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त कायम आहे. कर्नाटक पोलिसांचा फौजफाटा येळ्ळूरमध्ये बंदोबस्तासाठी आज, बुधवारपर्यंत तैनात केलेला आहे. पोलिसांची जवळपास ५० हून अधिक वाहने आणि ७०० हून अधिक पोलीस या गावात बंदोबस्तासाठी तैनात आहेत. गावातील बहुसंख्य तरुणांनी अद्याप पोलिसांच्या अटकेच्या भीतीने गावाबाहेरच राहणे पसंत केले आहे. ते कोल्हापूर, सांगली, चंदगड भागांत आपल्या नातवाइकांकडे राहत आहेत. सध्या गावात वडीलधारी मंडळी राहिली आहेत. येळ्ळूरमधील फलक हटविल्यानंतर अटक केलेल्या सात युवकांना अद्याप कर्नाटक सरकारने जामीन मंजूर केलेला नाही. उद्या, गुरुवारी पुन्हा त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या युवकांवर सरकारी कायद्याचे उल्लंघन आणि कोर्टाचा आदेश न पाळणे, सरकारी कामात अडथळा आणणे, असे गुन्हे नोंदविले आहेत. कन्नड पोलिसांना ‘महाराष्ट्र’चाच सहारा येळ्ळूर गाव सीमालढ्यात अग्रगण्य आहे; कारण कर्नाटक सरकारने ‘महाराष्ट्र राज्य’ नावाचा फलक जरी हटवला असला, तरी महाराष्ट्र राज्य नावाच्या अनेक खुणा येळ्ळूरमध्ये पाहायला मिळतात. येळ्ळूरमध्ये दरवर्र्षी कुस्त्यांचे मोठे मैदान भरते. या मैदानाचे नावसुद्धा ‘महाराष्ट्र मैदान’ आहे. याशिवाय महाराष्ट्र हायस्कूल, महाराष्ट्र चौक अशी महाराष्ट्राशी संबंधित अनेक ठिकाणे या गावात आहेत. भलेही कर्नाटक पोलिसांना ‘महाराष्ट्र’ या शब्दाचा तिटकारा असला तरी सध्या बंदोबस्तासाठी असलेले पोलीस महाराष्ट्र हायस्कूलच्या आवारातच स्वत:चे जेवण स्वत:च तयार करून खात आहेत. पोलिसांनी या ठिकाणी मंडप उभारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कन्नड फलक हटवाकर्नाटक उच्च न्यायालयाने, कोणत्याही सरकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज फडकत असताना, बेळगावमधील प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फडकत असलेल्या लाल-पिवळ्या ध्वजाला मान्यता दिली नाही. कर्नाटक उच्च न्यायालयानेदेखील हा ध्वज काढण्याचा आदेश दिला आहे. मात्र, जिल्हा प्रशासन हा ध्वज हटवायला तयार नाही. हा ध्वज हटवावा या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी एन. जयराम आणि प्रादेशिक आयुक्त यांना निवेदन सादर केले. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष नरेश पाटील आणि अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)