नगरसेवकांची दररोज सकाळी प्रभागात फेरी ठरलेली, कोणतेही कार्यालय नसताना फक्त फोन करताच हजर, ‘हुंबे साहेब, पाणी आले नाही’. ‘थांबा टँकर घेऊन येतो,’ अशा किरकोळ मात्र सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याच्या माध्यमातून नगरसेवकांनी प्रभागात दांडगा संपर्क ठेवल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होते. सागरमाळ प्रभाग म्हणजे ८० टक्के उच्चभ्रू व ३० टक्के मध्यमवर्गीयांची वसाहत होय. इंगळे कॉलनी, काशीद कॉलनी, सरनाईक कॉलनी, गोविंदराव हौसिंग सोसायटी या प्रमुख वसाहती या प्रभागात येतात. पाण्याचा, अंतर्गत रस्ते व कचरा उठाव या प्रमुख समस्या येथील नागरिकांची होत्या. मात्र, हुंबे यांनी प्रभागातील प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी दृष्टीने प्रयत्न केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. व्यक्तिगत संपर्क आणि कामाच्या पद्धतीबद्दल समाधान असले तरी रेड्याची टक्कर ते शास्त्रीनगरकडे जाणारा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने येथील नागरिकांची मोठी अडचण होत असल्याने नाराजी आहे. येथे पाण्याचा प्रश्न मोठा होता. मात्र, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सम्राटनगर येथे १० लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली आहे. राजेंद्रनगर ओढ्यामुळे एस. एस. सी. बोर्ड व सम्राटनगर हे भाग वेगळे झाले होते. हा भाग जोडण्यासाठी या ठिकाणी पूल व्हावा, अशी कित्येक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. येण्या-जाण्यासाठी दोन किलोमीटरचा लांबचा पल्ला मारून नागरिकांना प्रवास करावा लागत होता. मात्र, हुंबे यांनी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी ओंमकार प्लाझा व भीमा बिल्डिंग येथे अशा दोन ठिकाणी पुलांच्या बांधणीचे काम सुरूकेले आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे, हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. तसेच प्रभागात वेळच्यावेळी कचरा उठाव होतो. यासह भागातील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली असली तरी अजूनही काही रस्ते अपुरे आहेत. निधी नसल्याने ती कामे प्रलंबित आहेत, असे नगरसेवक म्हणतात. तसेच गोविंदराव हौसिंग सोसायटी येथे मोकळ््या जागेत गटारीचे नियोजन नाही. त्यामुळे जागामालकांनी या ठिकाणी गटारींचे नियोजन करावे, अशी मागणी आहे तसेच येथील रस्त्यावर खडी पडली, पण रस्ता झालेला नाही. हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी होत आहे. भगतसिंग कॉलनी येथे नगरोत्थान महाअभियानांतर्गत नाला चॅनेलचे बांधकाम पूर्ण केले आहे. भागात सम्राटनगर येथे १० लाख लिटर पाण्याची टाकी, पाईपलाईन टाकली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे. तसेच प्रभागात सांस्कृतिक हॉल बांधण्यात येणार आहे. अपुऱ्या निधीमुळे अजून काही कामे प्रलंबित आहेत. ती लवकरच पूर्ण केली जातील. - राजू हुंबे, नगरसेवक उद्याचा प्रभाग क्रमांक - ६९ क्रांतिसिंह नाना पाटील नगर
संपर्क, कामांचा धडाका, पण गती संथ
By admin | Updated: January 17, 2015 00:11 IST