कोल्हापूर : विधान परिषद उमेदवारीसाठी कॉँग्रेस श्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी केल्यानंतर इच्छुकांनी आता नेत्यांच्या गाठीभेटी व मतदारांची संपर्क मोहीम हाती घेतली आहे. प्रचाराची दुसरी फेरी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीबाबत अहवाल सादर केला असून, २५ नोव्हेंबरनंतरच उमेदवारीची घोषणा महाराष्ट्र कॉँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश करण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषद उमेदवारीसाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे हे इच्छुक आहेत. दोन दिवसांपूर्वी सतेज पाटील, पी. एन. पाटील व आमदार महाडिक या तिघांच्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुलाखती घेतल्या. आवाडे यांच्यासाठी इचलकरंजी कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. आमदार महाडिक यांनी थेट दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण भेट होऊ शकली नाही. उमेदवारी आपल्याच पदरात पडावी, यासाठी सतेज पाटील व पी. एन. पाटील, आमदार महाडिक यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तिन्ही नेते कोल्हापुरात दाखल झाले असून, आता प्रचाराच्या दुसऱ्या फेरीचे नियोजन केले आहे. सतेज पाटील व आमदार महाडिक यांनी जिल्ह्णातील नेतेमंडळी व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. उमेदवारीची मोर्चेबांधणी करून त्यांनी दुसऱ्यांदा गाठीभेटी सुरू केल्या आहेत. विभागनिहाय विश्वासू कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत विधान परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच साधारणत: २४ किंवा २५ नोव्हेंबरला थेट कॉँग्रेसच्या केंद्रीय समितीकडूनच उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणूकीबाबत कमालीची उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)सोशल मीडियावर चर्चा --विधान परिषदेची उमेदवारी कॉँग्रेसमधील तिन्ही नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे जिल्ह्णात कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी कमालीची उत्सुकता लागली आहे. सतेज पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी प्रदेशाध्यक्षांना आदेश दिले व पाटील यांच्या उमेदवारीची तब्बल ३५ आमदारांनी मागणी केल्याचा संदेश दुपारनंतर सोशल मीडियावर फिरत होता; पण कॉँग्रेसच्या गोटातून त्याला दुजोरा मिळाला नाही.
मोर्चेबांधणी करून इच्छुक संपर्कात
By admin | Updated: November 21, 2015 00:40 IST