लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : बांधकाम कामगारांसाठीचा कायदा १९९६मध्ये तयार झाला होता. पण मला कामगारमंत्री पदाची जबाबदारी मिळाली, तेव्हा त्याची अंमलबजावणी आपण केली. हजारो कोटींचे कल्याणकारी मंडळ सुरू केले. आता पुन्हा ही जबाबदारी आल्यावर नवनवीन योजना राबवत असून, बांधकाम मजुरांना दोनवेळचे जेवण हा एक अभिनव प्रकल्प आहे. एकूण एकवीस प्रकारच्या मजुरांचा समावेश करून व्याप्ती वाढवली असून, याचा मजुरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल येथे बांधकाम मजुरांना मोफत मध्यान्ह जेवण उपक्रमाची सुरुवात शनिवारी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सतीश माने, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने, प्रकाश गाडेकर, काॅ. शिवाजी मगदूम उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना लाॅकडाऊनच्या काळात संचारबंदीमुळे पोटाला अन्न मिळत नाही म्हणून अनेक कामगार, मजूर गावी गेले, ते परत आले नाहीत. म्हणूनच दुसऱ्या लाटेत त्यांच्या पोटापाण्याची सोय करण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यातून मध्यान्ह भोजन योजनेचा उगम झाला असून, राज्यभरातील बांधकाम कामगारांना दोनवेळचे जेवण उपलब्ध करून देणार आहोत. यावेळी स्वागत प्रवीण काळबर यांनी केले. भय्या माने, कामगार विभागाचे संदेश आहिरे, कागल क्रीडाईचे अध्यक्ष सुशांत भालबर, प्रकाश गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट
योग्य ठिकाणी पैसा गेला...
कागल क्रीडाईचे अध्यक्ष सुशांत भालबर म्हणाले की, मंत्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगार महामंडळासाठी एक टक्का सेस आकारणी केल्यानंतर आमच्यासह राज्यभरातील बांधकाम व्यावसायिक चिंतेत होतो. पण त्यांनी बांधकाम कामगारांना दिलेल्या एकूण योजना आणि आता दोनवेळचे जेवण पाहून आमचे पैसे योग्य ठिकाणी गेल्याचे समाधान वाटते.
सफाई कर्मचाऱ्यांनाही समाविष्ट करा
जवळपास सर्वच असंघटित कामगार या योजनेत आले आहेत. फक्त सफाई कर्मचारी वंचित आहेत. त्यांनाही बांधकाम महामंडळाचे लाभ द्या, अशी मागणी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी केली. तर भय्या माने यांनी मंत्री मुश्रीफ यांनी सुरुवातीला बांधकाम व्यावसायिकांची टीका सहन केली पण एक टक्का सेस वसूल केलाच. आज यामुळेच कामगारांचे कल्याण होत आहे, असे सांगितले.
फोटो
कागल येथे बांधकाम कामगारांना मोफत भोजन थाळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आली. यावेळी भय्या माने, प्रवीण काळबर, प्रकाश गाडेकर, आदी उपस्थित होते.