मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीपाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथेसुध्दा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठया प्रमाणावर सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात या चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात घेण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, कोल्हापूरची चित्रनगरी कात टाकत असून, येथे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात केलेल्या कामांमुळे आज येथे मोठया प्रमाणावर चित्रीकरण सुरू आहे. कोल्हापूरची चित्रनगरी विकसित झाली, तर मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपट आणि मालिकांची संख्या वाढू शकते आणि त्याचा फायदा कलाकारांसह तंत्रज्ञ कलाकारांनाही होणार आहे. येणाऱ्या काळात चित्रीकरणासाठी आवश्यक असणारे सेटर्स कायमस्वरुपी उभारणे, कलाकार आणि तंत्रज्ञानांसाठी वसतिगृहे उभारणे यावर भर देण्यात यावा.
चौकट
समाजसुधारकांवर चित्रपट निर्मिती
आजच्या पिढीला थोर समाजसुधारकांचे महत्त्व आणि त्यांनी केलेले कार्य समजण्यासाठी थोर समाजसुधारकांवर सिनेमे बनविण्यात येणार आहेत. छत्रपती शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर अशा महनीय व्यक्तींवरील सिनेमा बनविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल, असे देशमुख यांनी सांगितले.