इचलकरंजी : निवडणूक काळामध्ये भाजपाने केलेल्या घोषणा वल्गनाच ठरल्या आहेत. स्वत:साठी ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या मोदीप्रणित भाजपा सरकार गोरगरीब जनतेच्या मुळावर उठले आहे. गोरगरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या या सरकारविरोधात कॉँग्रेसने आता ‘एल्गार’ पुकारला आहे. जनतेच्या हितासाठी जनआंदोलनाद्वारे संघर्ष करून भाजपाला सळो की पळो करून सोडू, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चावेळी आवाडे बोलत होते. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना निवेदन दिले. त्यानंतर बोलताना आवाडे म्हणाले, केसरी शिधापत्रिकांवर धान्य, खाद्यतेल व रॉकेल मिळाले पाहिजे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना गेले आठ महिने बंद करण्यात आलेले अनुदान पुन्हा सुरू करावे. झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी कॉँग्रेसने सुरू ठेवलेली मोहीम झोपडपट्टी निर्मूलनापर्यंत सतत सुरू राहावी. रमाई आंबेडकर योजनेतून दारिद्र्यरेषेखालील मागासवर्गीय कुटुंबीयांना त्वरित घरकुले बांधून द्यावीत. यंत्रमाग कामगारांना पाच लाखांची घरकुले मिळण्याबरोबरच त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी. घरेलू कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळावी, तर यंत्रमागासाठी विजेच्या दराची सवलत देण्यात यावी, अशा आमच्या मागण्या आहेत. यावेळी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, शामराव कुलकर्णी, अहमद मुजावर, शशांक बावचकर, संजय केंगार, मोहन काळे, आदींची भाषणे झाली. मोर्चामध्ये जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, विलास गाताडे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, सतीश डाळ्या, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अशोक सौंदत्तीकर, किशोरी आवाडे, अंजली बावणे, रवी रजपुते, राहुल आवाडे, शेखर शहा, आदी सहभागी झाले होते. मोर्चाच्या शेवटी आनंदा कोरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
इचलकरंजीत सरकारच्या विरोधात काँग्रेसचा विराट मोर्चा
By admin | Updated: July 21, 2015 01:42 IST