कोल्हापूर : केंद्र सरकारचे अन्यायी तीन कृषी कायदे, महागाईविरोधात शुक्रवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेेसनेही लक्षणीय सहभाग नोंदवला. जिल्हा काँग्रेस कमिटीसह सर्व तालुक्यांत एक दिवसाचे उपाेषण सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांची रीघ लागली होती, यानिमित्त का असेना, पण बऱ्याच वर्षांनी काँग्रेसच्या नव्या- जुन्या कार्यकर्त्यांचे पाय काँग्रेस कमिटीला लागले.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आवाहनानुसार शुक्रवारी भारत बंद आंदोलन झाले. काँग्रेस यात ताकदीने उतरेल, असे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जाहीर केल्यानुसार राज्यभरातही आक्रमकपणे एक दिवसाचे उपोषण करा, असे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. जिल्हा मुख्यालय व तालुका कार्यालयातही जोरदारपणे आंदोलन करण्याचे आदेश शिरसावंद्य मानून कोल्हापुरातील आंदोलनाला बऱ्याच वर्षांनी बहुतांश काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर उतरवत हजेरी लावली. स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत शहर व करवीर तालुका तर इतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्थानिक आजी- माजी आमदारांनी आंदाेलनाचे नेतृत्व केले.
कोल्हापुरातील आंदोलनाचे नेतृत्व पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. पक्षनिरीक्षक म्हणून आ. शिरीष चौधरी उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, आ. जयंत आसगावकर, गोपाळराव पाटील, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, दिलीप पाटील, सुरेश कुऱ्हाणे, संध्या घोटणे यांच्यासह काँग्रेस, नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चौकट ०१
पी.एन. यांच्या अनुपस्थितीची चर्चा
आंदोलनात झाडून सारे काँग्रेसी नेते सहभागी झाले असताना आ. पी.एन. पाटील अनुपस्थित होते. त्यांना फोनद्वारे निरोप दिला होता; पण त्यांचा काही निरोप आला नाही. ते आले असते तर अधिक विस्ताराने चर्चा केली असती, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पी.एन. आणि त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांची अनुपस्थिती आंदोलनस्थळी चर्चेचा विषय होता.
चौकट ०२
जम्बो सिलिंडर ठरला आकर्षण
आंदोलनस्थळी लाल रंगातील जम्बो सिलिंडरची प्रतिकृती उभारण्यात आली होती. यावर महिनागणिक वाढलेले गॅसचे दर लिहून ‘हे का अच्छे दिन’ अशी विचारणा केली होती. आंदोलनावेळी हा जम्बो सिलिंडर खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. दरम्यान याला मिळालेला प्रतिसाद पाहून शहरात मोक्याच्या दहा ठिकाणी असे जम्बो सिलिंडर पोलिसांच्या रीतसर परवानगीनंतर लावले जाणार आहेत. याबाबतच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी संबंधित कंत्राटदाराला बोलावून दिल्या, खर्च मी देतो, असे त्यांनी सांगितले.
फाेटो: २६०३२०२१-कोल-कॉंग्रेस ०१
फोटो ओळ : भारत बंदनिमित्त शुक्रवारी कोल्हापुरात जिल्हा काँग्रेसतर्फे एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व पक्षनिरीक्षक शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत. (छाया : नसीर अत्तार)
फाेटो: २६०३२०२१-कोल-कॉंग्रेस ०१
फोटो ओळ: भारत बंदनिमित्त शुक्रवारी कोल्हापुरात जिल्हा काँग्रेसतर्फे एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व पक्षनिरीक्षक शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत.
(छाया : नसीर अत्तार)फाेटो: २६०३२०२१-कोल-कॉंग्रेस ०२
फोटो ओळ: भारत बंदनिमित्त शुक्रवारी कोल्हापुरात जिल्हा काँग्रेसतर्फे झालेल्या उपोषणावेळी आंदोलनस्थळी उभारण्यात आलेला जम्बो सिलिंडर आकर्षण ठरला.
(छाया : नसीर अत्तार)