कोल्हापूर : महानगरपालिकेत प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करावे, असा कौल कोल्हापूरकरांनी दिल्यानंतर आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतरही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल,’ असा गौप्यस्फोट केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात धास्ती पसरली आहे. ‘राजकारणात चमत्कार घडत असतात,’ असे सूचक वक्तव्य पालकमंत्र्यांनी केल्यामुळे त्यामध्ये कोणते ‘अंडर करंटस्’ आहेत का; यावरही काँग्रेसकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकून सत्तेचा प्रमुख दावेदार होण्याचा मान मिळविला. राष्ट्रवादीने १५ जागा मिळविल्या. त्यामुळे काँग्रेसचा महापौर होण्यात कसलीच अडचण होणार नाही, हे स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ भाजप व ताराराणी युतीने ३२ (१३ + १९) जागा मिळवून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भाजप व ताराराणी आघाडीने महापालिकेत आपली जबाबदारी पार पाडावी, असाच मतदारांचा कौल आहे; परंतु सत्ता मिळविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेगळ्या पद्धतीने हालचाली सुरू केल्याने ‘दुधात मिठाचा खडा’ नको म्हणून कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी घाईगडबडीने राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून आघाडी करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारच्या बैठकीत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती या पदांच्या संदर्भातील निर्णय झाले आहेत, अन्य पदांच्या बाबतीत निर्णय व्हायचे आहेत. त्यावर चर्चा करण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आले. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होताच पालकमंत्री पाटील यांनी चोवीस तासांपूर्वीचे आपले वक्तव्य बदलून ‘राजकारणात चमत्कार घडत असतात, १६ तारखेला आमचाच महापौर होईल,’असे वक्तव्य केले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात पुन्हा धडकी भरली आहे.प्रत्यक्षात कागदावरचे संख्याबळ पाहता भाजपला आपला महापौर करणे केवळ अशक्य आहे तरीही पालकमंत्र्यांनी आत्मविश्वासाने चमत्काराची भाषा केली. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात धास्ती निर्माण झाली असून या वक्तव्यांत काही संदर्भ जोडले जात आहेत का, याची शहानिशा केली जात आहे. ‘साबरमती ते बारामती’ असा एक संदर्भ शिवसेनेने पुढे आणला होता, त्यात काही तथ्थ आहे का? राज्य तसेच देशपातळीवरील राजकारणाचे पडसाद काही उमटणार आहेत का हेही तपासून पाहिले जात आहे. भाजपची जास्त भिस्त राष्ट्रवादीवर असली तरी भविष्यकाळात भाजप आणि राष्ट्रवादी अशी युती होणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने काँग्रेस गोटात धास्ती
By admin | Updated: November 5, 2015 00:45 IST