कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीत समाविष्ट असलेल्या गावांतील ग्रामस्थ हद्दवाढीमध्ये समाविष्ट व्हावे की होऊ नये, याबाबत संभ्रमात असून, त्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी रविवारी गोकुळ-शिरगाव ग्रामपंचायत हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. ‘विचारमंथन’ असे या बैठकीचे स्वरूप असून, त्यानंतर ग्रामस्थ निर्णय घेणार आहेत.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे आदेश महापालिका प्रशासनास दिल्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचा विषय सध्या जोरात चर्चेत आला आहे. महानगरपालिका प्रशासनानेही मंत्र्यांच्या आदेशानुसार तातडीने अठरा गावे आणि लगतच्या दोन औद्योगिक वसाहतींचा समावेश करण्याची विनंती करणारा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविला आहे.
नगरविकासमंत्री शिंदे कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याच्या बाजूचे आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर त्यासाठी सतत पाठपुरावा करीत आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी एका कार्यक्रमात हद्दवाढीशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही अशा शब्दांत हद्दवाढीचे समर्थन केले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही ग्रामस्थांना विश्वासात घेऊन एक पाऊल पुढे जायला पाहिजे असे सांगितले आहे. त्यामुळे यावेळी शहराची हद्दवाढ होणार अशीच अटकळ बांधली जात आहे.
प्रस्तावित हद्दवाढीत समाविष्ट असलेल्या गावांतील ग्रामस्थ मात्र याबाबत संभ्रमात आहेत. कोल्हापूर शहरात समाविष्ट व्हावे का, झालो तर आपल्याला त्याचा काय फायदा होऊ शकतो, आणि नाही झालो तर त्याचे काय परिणाम होतील, याबाबत आडाखे बांधण्यास ग्रामस्थांनी सुरुवात केली आहे.
हद्दवाढविरोधी कृती समिती सक्रिय झाली असून, त्याचे निमंत्रक राजू ऊर्फ सुनील माने आहेत. त्यांनी रविवारी गोकुळ-शिरगाव ग्रामपंचायत हॉल येथे ‘विचारमंथन’ बैठक आयोजित केली आहे. ग्रामस्थांची मते ऐकून घेऊन हद्दवाढीत समाविष्ट व्हावे की विरोध करावा, याचा निर्णय घेतला जाईल, असे माने यांनी सांगितले.