कोल्हापूर : निवडणुकीच्या दिवशी वाहनांचा गैरप्रकार होत असेल तर ती वाहने जप्त करावीत, अतिसंवेदनशील क्षेत्र व झोपडपट्टी भागात भरारी पथके, पेट्रोलिंग करा, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी केल्या. आयुक्त सहारिया, अप्पर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीस, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीची प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली तसेच पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी पोलीस खात्याकडून निवडणुकीशी संबंधित सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. याद्वारे लोकांमध्ये विश्वास निर्माण करून निवडणूक नि:ष्पक्षपाती पार पाडली पाहिजे. याकरिता आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्याचे निराकरण वेळीच करा, तसेच निवडणूक दिवशी वाहनांचा गैरवापर होते, अशी वाहने जप्त करण्याची कारवाई करा. अतिसंवेदनशील क्षेत्र व झोपडपट्टी भागात भरारी पथके, अशा सूचना यावेळी दिल्या. अप्पर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी, राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनीही मार्गदर्शनपर सूचना दिल्या.यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, निवडणूक निरीक्षक रुपिंदर सिंह, जिल्हाधिकारी अमित सैनी, सहायक निवडणूक निरीक्षक प्रमोद यादव, संजयसिंह चव्हाण, आचारसंहिता प्रमुख भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, विजय खोराटे, सहायक आयुक्त शीला पाटील, उमेश रणदिवे, सर्व निवडणूक अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
निवडणुकीत गैरवापर करणारी वाहने जप्त करा
By admin | Updated: October 20, 2015 00:19 IST