आंबोली : आंबोली घाटात गेली तीन वर्षे सतत छोट्या-मोठ्या दरडी कोसळण्याचे प्रकार चालू आहेत. यासाठी बांधकाम विभागही दक्षता घेत आहे. मात्र, अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच असून, पूर्वीचा वसनजीक एक दरडीचा दगड अर्धा तुटून बाहेर आल्याने तो केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे तो दगड बांधकाम विभागाने पाडावा, अशी मागणी होत आहे. आंबोली पूर्वीचा वस येथून पुढील सात ते आठ किलोमीटर परिसरात दरड कोसळण्याचे प्रकार गेली काही वर्षे सुरू आहेत. गतवर्षी अशा धोकादायक ठिकाणांवरील दरड बांधकाम विभागाकरवी पाडण्यात आली होती. मात्र, सद्य:स्थितीत बांधकाम विभागाने आंबोली घाटाचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. चाळीस फुटांची मोरी याठिकाणी, तर दगडाची कपारी सुटल्याचे दिसत असून, ती दरड केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे, परंतु बांधकाम विभाग संरक्षक कठडे, रस्ते, गटारी बांधण्यात व्यस्त दिसत आहे. ऐन पावसाच्या तोंडावर ही दरड पडल्यास बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. ही दरड लवकरात लवकर न हटविल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता स्थानिक व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
आंबोली घाटातील दरड कोसळण्याच्या स्थितीत
By admin | Updated: May 11, 2015 00:55 IST