दत्तावतारी असलेल्या टेंबे स्वामी महाराज यांच्या उत्सवानिमित्त मर्यादित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवकालात टेंबे स्वामी महाराज मंदिरात दररोज सकाळी ७ ते १२ यावेळेत ऋग्वेद संहिता, श्रीमद गुरुचरित्र आदींचे पारायण तसेच श्रीसूक्त, मन्यू सूक्त, सौर सूक्त, श्री गणपती अथर्वशीर्ष व रुद्र यांची आवर्तने करण्यात आली. चार वाजता वेदमूर्ती दिलीपशास्त्री उपाध्ये यांचे पुराण, कीर्तनकार ह.भ.प. शरदबुवा घाग यांचे कीर्तन झाले. उत्सव काळात सात दिवस अखंड ‘दिगंबरा दिगंबरा..’ या महामंत्राचे नामस्मरण मर्यादित ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उत्सव सांगतानिमित्त होणारी ग्रामदिंडी रद्द करण्यात आली. दत्त मंदिरात प्रार्थनेने नामस्मरणाची सांगता झाली. सकाळी अकरा वाजता टेंबे स्वामी मंदिरात महापूजा करण्यात आली. नंतर राहुल जेरे पुजारी यांनी उद्धवशास्त्री उपाध्ये यांच्या पौरोहित्याखाली ब्राम्हण पूजन व तीर्थराज पूजन केले तर श्रीकांत वासुदेव पुजारी यांनी पंचोपचार पूजन व अन्नपूर्णा पूजन केले.
सात दिवस चालू असलेल्या या उत्सवाचे दत्त देव संस्थानच्या वतीने नेटके नियोजन करण्यात आले होते. उत्सवासाठी विश्वस्त प्रा. गुंडो पुजारी, अशोक पुजारी, विकास पुजारी, रामकृष्ण पुजारी,गोपाळ पुजारी,अमोल विभूते, महेश हावळे यांनी परिश्रम घेतले.
फोटो - ११०७२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - श्री परमहंस परिवाजिकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची बांधण्यात आलेली पूजा.