कोल्हापूर : शासनाने सेवेत कायम करण्यात यावे, आठ हजारप्रमाणे वेतन प्रत्येक महिन्याला मिळावे, यासह विविध मागण्यांकडे वेळोवेळी लक्ष वेधले. मात्र, मागण्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ११ नोव्हेंबरपूर्वी मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा १२ पासून ‘काम बंद’ आंदोलन करण्याच्या इशाऱ्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन दिले. निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘संग्राम कक्षा’ची स्थापना केली आहे. या कक्षात संगणक परिचालकाची (डाटा आॅपरेटर) नेमणूक केली आहे. मात्र शासनाने निर्धारित केलेले ८ हजार रुपये मानधन न देता विना पदवीधारकांना साडेतीन हजार, तर पदवीधारकांना तीन हजार आठशे रुपये दिले जाते. मानधन, संगणक देखभाल, दुरुस्ती, छपाई साहित्य कधीही वेळेवर दिलेले नाही. तीन वर्षांत विविध मागण्यांसंबंधी अर्ज, विनंत्या, निवेदन यापूर्वी दिल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांप्रमाणे वेतनवाढ करावी, कपात केलेले वेतन द्यावे, शेअर्स म्हणून २०० रुपये कापून घेतलेले परत द्यावेत, दरमहा १ ते १० तारखेपर्यंत वेतन खात्यावर जमा करावे, मिटिंगचा प्रवासभत्ता वाढवावा, ‘संग्राम कक्षा’त इंटरनेटसाठी ब्रॉडबँड कनेक्शन द्यावे, आदी मागण्या आहेत. कंपनीच्या जाचक अटींमुळे परिचालकाची आर्थिक ओढाताण होते. परिणामी, मागण्या मान्य न झाल्यास १२ पासून ‘काम बंद’ आंदोलनााचा निर्णय घेतला आहे. निवेदन देताना संघटनेचे राज्याध्यक्ष विशाल चिखलीकर, जिल्हा सुनील देवेकर, मनिष नरके, प्रकाश भोसले, प्रशांत पाटील, श्रीकांत शिंदे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संगणक परिचालकांचा ‘काम बंद’चा इशारा
By admin | Updated: November 8, 2014 00:26 IST