कोल्हापूर : महापुरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना लवकर मिळावी यासाठी शेतीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा, शेडनेट, ठिबक सिंचन योजनांबरोबरच जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ वेळेत मिळवून देण्यासाठी तसेच पीकविमा देण्यात कंपन्या आडकाठी करत नाहीत ना याबाबत दक्षता घ्या, अशा सूचना कृषी, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर वाकुरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
सहकार क्षेत्राचा आढावा घेताना मंत्री कदम म्हणाले, ‘कोल्हापूर ही सहकाराची पंढरी’ आहे. या विभागाच्या अडीअडचणी व कामांबाबत सविस्तर बैठक घेण्यात येईल. जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण सहकारी संस्थांना बळकटी देण्याबाबतही विचार करू.
---