कोल्हापूर : ‘गोकुळ’ म्हणजे सहकाराच्या आदर्शातून निर्माण झालेल्या समृद्धीचे प्रतीक, असे गौरवोद्गार डॉ. सागर देशपांडे यांनी ‘गोकुळ’चे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोतल होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक अरुण नरके होते.
संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर म्हणाले, ‘गोकुळ’च्या वाटचालीत आनंदराव पाटील-चुयेकर यांचा फार मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यातील गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांना संघामुळे दर दहा दिवसाला पैसे मिळत असल्याने त्यांचे जीवनमान उंचावले आहे. या सहकारी संस्था स्थापन करणे, चालविणे सोपे आहे; पण यशस्वी करणे अतिशय अवघड आहे. मात्र, हे अवघड काम पाटील यांनी केले. पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बोर्ड सचिव एस. एम. पाटील यांनी आभार मानले. यावेळी ज्येेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील, धैर्यशील देसाई, पी. डी. धुंदरे, विलास कांबळे, अनुराधा पाटील, आदी उपस्थित होते.
दरम्यान, ‘गोकुळ’च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यातही आनंदराव पाटील यांना अभिवादन करण्यात आले. व्यवस्थापक डॉ. व्ही. डी. पाटील म्हणाले, आनंदराव पाटील यांनी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी केंद्रबिंदू मानून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी ‘गोकुळ’ची निर्मिती केली. याची जाणीव ठेवून कर्मचाऱ्यांनी निष्ठेने काम करावे, तीच पाटील यांना खरी आदरांजली ठरेल. यावेळी अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी : ‘गोकुळ’ संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त संघाच्या आवारातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डी. व्ही. घाणेकर, धैर्यशील देसाई, विश्वास पाटील, अरुण नरके, पी. डी. धुंदरे, रणजितसिंह पाटील, राजेश पाटील, अरुण डोंगळे उपस्थित होते. (फोटो-१७०१२०२१-कोल-गोकुळ)