कोल्हापूर : स्त्री-भ्रूण हत्या, सोशल मीडियाच्या आहारी गेलेला मनुष्य अशी डोळ्यांत अंजन घालायला लावणारी मांडणीशिल्पे, विविध व्यक्तिचित्रे अन् राग, ‘अहिर भैरव’ची आळवणी असा अनोखा रंगसुरांचा अनुभव आज, रविवारी टाऊन हॉलमध्ये कलाप्रेमींनी अनुभवला़ निमित्त होते ‘रंगबहार’ या संस्थेतर्फे कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग नागेशकर यांच्या स्मृतिसोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रंगसुरांच्या मैफिलीचे़़़सकाळी साडेनऊ वाजता टाऊन हॉल येथे सुरू झालेल्या रंगासुरांच्या रंगबहार मुक्त उधळणीत पुणे, मुंबई, तसेच सांगली आणि कोल्हापुरातील अनेक चित्र-शिल्प कलाकारांनी सहभाग घेतला़ चित्रकारांनी कुंचल्याच्या मदतीने जलरंग-तैलरंगामध्ये साकारलेली व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे व त्यांतील भाव इतके विलक्षण होते की, टाऊन हॉलचे निसर्गसौंदर्य पाहणे विसरून कलाप्रेमी या चित्रांच्या दुनियेत हरवून बसले़ रंग-शिल्पांतून मानवी जीवनाशी संबंधित विविध पैलूंची, सामाजिक विषयांची मांडणी करताना कलाकारांनी केलेला कलासौंदर्याचा कल्पक वापर थक्क करणारा होता़ विविध निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे कुंचल्यातून अलगदपणे कागदावर आकार घेत होती आणि रसिकांना स्मरणीय अनुभव देत होती.रंगाच्या या मुक्त उधळणीमध्ये स्वरमयी संगीतशिक्षण संस्थेच्या सविता कबनूरकर-वेल्हाळ यांच्या शास्त्रीय गायनाने चार चाँद लागले़ ‘अहिर भैरव’ रागाने संगीत मैफल सुरू झाली़ त्यानंतर ‘सावन की रुत आयी’ ही ठुमरी तसेच ‘जय अंबिके, सूर पूजिते’ ही रचना सादर केली़ रसिकांनी या भरभरून प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तपस्वी कलावंत बी़ आऱ टोपकर यांना ‘रंगबहार जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले़ तसेच नवोदित चित्र-शिल्प कलाकारांचा गौरवही करण्यात आला़ यावेळी ‘रंगबहार’चे संस्थापक ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, अध्यक्ष प्राचार्य अजेय दळवी, कार्यवाह धनंजय जाधव, मार्गदर्शक व्ही़ बी़ पाटील, रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे संदीप मिरजकर, इंद्रजित नागेशकर, विजय टिपुगडे, अमृत पाटील, आदी उपस्थित होते़श्रीकांत डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले, तर रियाज शेख यांनी आभार मानले़ या रंगप्रदर्शनात शंकर गोजारे, रामचंद्र खरटमल (पुणे), मोहसिन मतवाल - इचलकरंजी, रवी शिंदे - देवराष्ट्रे, सागर ढेकणे, बबन माने, संतोष पोवार, प्रवीण वाघमारे (कोल्हापूर) यांनी, तर शिल्पकार प्रदीप कुंभार, प्रशांत धुरी, संदीप कुंभार, रवी लोहार, मांडणी शिल्पकार अनुप संकपाळ, हर्षल कुंभार, जावेद मुल्ला, अमोल सावंत, हस्तकलाकार उज्ज्वल दिवाण यांनी भाग घेतला़ (प्रतिनिधी)अंजन घालणारी मांडणीशिल्पे मोबाईल टॉवरमुळे पक्ष्यांची होणारी जीवितहानी, स्त्री-भ्रूण हत्या, ई-कचऱ्यात हरविलेला माणूस, सोशल मीडियाच्या आहारी गेलेला मनुष्य ही मांडणीशिल्पे आधुनिक जीवनशैलीवर प्रकाश टाकत कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेत होती़ ‘रंगबहार’ या संस्थेतर्फे कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग नागेशकर यांच्या स्मृतिसोहळ्यानिमित्त रविवारी टाऊन हॉल येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तपस्वी कलावंत बी़ आऱ टोपकर यांना ‘रंगबहार जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले़ यावेळी शेजारी विजय टिपगुडे, संदीप मिरजकर, धनंजय जाधव, अजेय दळवी, श्यामकांत जाधव, इंद्रजित नागेशकर, श्रीकांत डिग्रजकर, आदी उपस्थित होते़
टाऊन हॉलमध्ये रंगसुरांची उधळण
By admin | Updated: January 19, 2015 00:28 IST