कोल्हापूर : किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढउतार होत असल्याने कोल्हापुरात सध्या थंडी आणि उष्णता यांचा एकत्रित सामना करावा लागत आहे. पहाटे किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत जात असल्याने आणि धुकेही पडत असल्याने थंडी जाणवत आहे, तर त्याच वेळी दुपारचे तापमानही ३२ ते ३४ अंशांवर जात असल्याने दिवसभर घामेघूम होण्याची वेळ आली आहे.
थंडीने कोल्हापुरातून बऱ्यापैकी काढता पाय घेतला आहे. पुढील चार पाच दिवस पहाटेचे तापमान कमी राहणार असले तरी त्यात फारशी तीव्रता नाही. गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षीही थंडीचा फारसा कडाका जाणवलाच नाही. सातत्याने कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळांमुळे ऐन थंडीत पावसाळ्याचा अनुभव घ्यावा लागला. नवीन वर्षाची सुरुवातही अशाच वातावरणात झाली. पहिल्या आठवड्यानंतर थंडी वाढेल, असा हवामान खात्याचा अंदाज होता; पण तो या विचित्र हवामानाने साफ खोटा ठरवत ऐन जानेवारीत हाश्शहुश्श करण्याची वेळ आणली आहे. रात्रीचे तापमानही २१ अंशांवर असल्याने थंडी जाणवतच नाही. पहाटे मात्र थोडीफार जाणवते. धुके आणि त्यासोबतच दवही पडत असल्याने गारवा जाणवतो; पण परत दहानंतर वातावरण तापू लागते.
चौकट ०१
थंड पेय, फळांची मागणी वाढली
उष्मा जाणवू लागल्याने थंड पेये व फळांची मागणी वाढू लागली आहे. जागोजागी रस्त्यावर कलिंगड, अननस विक्रेत्यांचे स्टॉल वाढू लागले आहेत. आइस्क्रीम खाण्यासाठीही गर्दी होऊ लागली आहे. मागील वर्ष पूर्ण कोरोनामध्येच गेल्याने आइस्क्रीम व स्टॉलवर फ्रुट सॅलड विकणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या वर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये सुरू होणारा व्यवसाय जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यातच सुरू झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
चौकट ०२
कमाल ३४
किमान १८