कोल्हापूर : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्हा परिषदेसमोर नव्यानेच उभारलेल्या पुतळ्याच्या परिसराची प्रजासत्ताक दिनी पहाटे स्वच्छता करण्यात आली. प्रयोगशील जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांचा हा उपक्रम अनुकरणीय ठरणारा आहे.
तिसंगी मतदार संघातून निवडून आलेले भगवान पाटील दोनवेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. अभ्यासू सदस्य म्हणून ते ओळखले जातात. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी त्यांनी वेगळी कल्पना ठरवली आणि ती अंमलातही आणली. २५ जानेवारीला पाटील हे यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे या जन्मगावी गेले. तेथील माती त्यांनी सोबत घेतली. तेथून ते कऱ्हाड येथील प्रीतीसंगमवर गेले व चव्हाण यांच्या समाधीस्थळाला वंदन केले. तेथील पाणी सोबत घेतले. त्यानंतर २६ जानेवारीला पहाटे त्या पाण्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयाला त्यांनी जलाभिषेक केला. तसेच सोबत आणलेली माती पुतळा परिसरातील रोपांना घातली. पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावरील श्रद्धेपोटी आरती लिहिली आहे. ती ही त्यांनी यावेळी गायली आणि अभिवादन केले.
कोट
‘आम्ही राजकीय वाटेवरचे वारकरी आहोत. यशवंतराव चव्हाण हे आमचे श्रद्धास्थान. आयुष्यभर त्यांनी बहुजन समाजासाठी काम केले. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना यशवंतराव चव्हाण यांचे कार्य सदैव प्रेरणादायी ठरणारे आहे. प्रजासत्ताक दिनी या लोकनेत्याचे स्मरण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नवऊर्जा देणारे ठरते. म्हणूनच या उपक्रमातून मी चव्हाण साहेबांना आदरांजली वाहिली.’
२७०१२०२१ कोल झेडपी ०२/३
जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी मंगळवारी पहाटे यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर प्रीतीसंगमवरून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक करून त्यांना अभिवादन केले.