कोल्हापूर : तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील मिळकती ग्रामपंचायतीच्या मालकीच्या नाहीत, तर दावा का दाखल केला? या प्रश्नावर उचगाव ग्रामपंचायतीला उच्च न्यायालयाने आज, बुधवारी सुनावणीवेळी चांगलेच फटकारले. मिळकतींची मालकी नसून हद्द ग्रामपंचायतीची आहे; त्यामुळे १५ दिवसांत हा दावा बदलतो, अशी विनंती ग्रामपंचायतीच्या वकिलांनी केली. दरम्यान, ‘जैसे थे’ आदेश असूनही व्यापाऱ्यांनी बांधकाम केल्याने महापालिकेतर्फे अवमान याचिका दाखल करण्यात आली, अशी माहिती महापालिकेचे सहायक अभियंता महादेव फुलारी यांनी ‘लोकमत’ला दिली.तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील २५ एकर जागा ट्रक टर्मिनस, कचरा डेपो व ना विकास क्षेत्र अशा तीन कारणांनी आरक्षित आहे. मात्र, जागा रीतसर ताब्यात घेतल्यानंतर केवळ ७/१२ पत्रकी नोंद करून घेण्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यानेच जागेच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण झाला होता. उचगाव ग्रामपंचायतीने ही जागा ग्रामपंचायतीच्याच मालकीची असल्याचा दावा करीत येथील मिळकतीही मालकीच्याच असल्याचा दावा करीत येथे बांधकाम परवाने देऊन घरफाळा वसुलीही सुरू केली. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेचा मालकी हक्क सिद्ध झाला. यानंतर उचगाव ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.परिसरातील मिळकतीची मालकी ग्रामपंचायतीची नाही. मात्र, हद्द आमची आहे, असे म्हणणे ग्रामपंचायतीच्या वकिलांनी सादर केले. मालकी हक्क नसताना कारवाई रोखण्याबाबत न्यायालयात का आलात? असा प्रतिसवाल न्यायालयाने केला. यानंतर महापालिकेच्या वकिलांनी तत्काळ स्थगिती आदेश उठविण्याची विनंती केली. स्थगिती उठविल्यास महापालिका तत्काळ कारवाई करून मिळकती पाडेल. त्यामुळे दावा बदलण्यास १५ दिवसांची मुदत द्या, ही ग्रामपंचायतीची मागणी न्यायालयाने मान्य केली. याबाबत आता पुन्हा १० फेब्रुवारीनंतर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे फुलारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उचगाव ग्रामपंचायतीचा दावाच चुकीचा
By admin | Updated: January 15, 2015 00:36 IST